वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. असे जरी असले तरी महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत.तर काही ठिकाणी अवघ्या वर्षभरातच रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे करण्यात आलेले काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वसई पूर्वेच्या भागातून मुंबई, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर, गुजरात यासह इतर भागांना जोडणारा मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हा महामार्ग अत्यंत महत्वाचा आहे. या महामार्गावर विविध ठिकाणी पडणारे खड्डे व विविध समस्या यातून सुटका व्हावी यासाठी महामार्ग प्राधिकरणाने वर्सोवा पूल ते अच्छाड पालघर अशा १२१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. यासाठी सहाशे कोटी रुपये इतका निधी खर्च केला आहे.
मात्र काँक्रिटीकरण केलेल्या रस्तावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी उंच सखल स्थिती निर्माण झाली आहे. तर काही टायर्स मार्क तयार होऊन रस्ता प्रचंड खराब झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. ससूनवघर येथील उड्डाण पूल, चिंचोटी यासह अन्य ठिकाणी मोठे टायर मार्क असल्याने त्यात दुचाकी अडकून अपघात होण्याची शक्यता आहे.रस्ता खराब झाल्याने प्रवासादरम्यान दुचाकीस्वार पडून अपघाताच्या घटना घडत आहेत. काँक्रिटीकरण व्यवस्थित न झाल्याने दुचाकी चालविताना अडचणी येत आहेत तर दुसरीकडे चारचाकी व अन्य वाहन चालक यांना ही उंच सखल स्थितीमुळे हादरे बसत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे.
काँक्रिटीकरण करवून झाल्यानंतर महामार्गावरील रस्ता अगदी गुळगुळीत होईल असे वाटले होते मात्र रस्त्याची स्थिती पाहता महामार्ग अधिक धोकादायक बनत असल्याचे वाहनचालक विशाल भगत यांनी सांगितले आहे.काँक्रिटीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे या महामार्गावर आत्ताच खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर खड्ड्यांचे स्वरूप मोठ्या खड्ड्यात होऊन महामार्गावरून प्रवास करणाऱ्यां वाहनचालकांना त्रासदायक ठरू शकते असे काँग्रेसचे कुलदीप वर्तक यांनी सांगितले आहे.यासाठी महामार्ग प्राधिकरणाने त्याठिकाणी जे खड्डे पडले आहेत ते तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी वर्तक यांनी प्राधिकरणाकडे केली आहे.
काँक्रिटीकरणानंतर ज्या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. त्या ठिकाणचा भाग काढून त्याठिकाणी पॅनल दुरूस्तीचे काम आम्ही करीत आहोत.लवकरच ती कामे ही मार्गी लागतील सुहास चिटणीस, प्रकल्प निर्देशक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
काँक्रिटीकरणाचे ९७ टक्के काम पूर्ण
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील काँक्रीटकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून आतापर्यंत ९७ टक्के इतके काम पूर्ण झाल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाने केला आहे. उर्वरित काम पावसाळ्याआधी पूर्ण केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे याशिवाय महामार्गावरील सुरक्षिततेसाठी दुभाजक उभारणी, डायव्हर्शन बोर्ड्स, कॉक्रीट बॅरियर, रिफ्लेक्टिव स्टिकर्स, ब्लिंकर्स लावण्यात आलेले आहे. अपघातप्रवण क्षेत्रांसाठी साइन बोर्ड, ब्लिंकर, ट्रान्सव्हर्स बार मार्किंग केले जात आहेत असे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.
रस्त्याच्या कडेला माती न टाकल्याने अपघाताचा धोका
महामार्गावर करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणामुळे रस्त्यांची उंची वाढली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेचा भाग सखल झाला आहे. त्या ठिकाणी रस्ता एक समान होण्यासाठी माती टाकली जाणार होती. अजूनही बहुतांश ठिकाणी माती न टाकण्यात आल्याने वाहनांचा अपघात होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. अनेकदा अत्यावश्यक क्षणी वाहन रस्त्याच्या कडेला घेताना अडचणी येत आहेत.