भाईंदर : प्रो-गोविंदामुळे सध्या शहरात उत्साहाचे वातावरण आहे त्यातच स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नेमण्यात आलेल्या जगप्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेलने बुधवारी मिरा भाईंदरमध्ये हजेरी लावली आहे. त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

‘प्रो-गोविंदा’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची अंतिम फेरी वरळीतील एनएससीआय डोम येथे ७, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. महाराष्ट्रातील मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार देशापुरता मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने यंदा वेस्ट इंडिजचे प्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेल ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहेत. या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावण्यासाठी राज्यभरातील १६ संघांमध्ये चुरस रंगणार आहे. यावेळी गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल विशेषतः आला आहे. भारताची संस्कृती, खेळ आणि इतर गोष्टी मला प्रभावित करत असल्यामुळे मी येथे वारंवार येत असतो, अशी माहिती गेल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मिरा भाईंदरमध्ये स्पेनचे मानवी मनोरे

भाईंदर पूर्व येथील नवघर मैदानात यावर्षीपासून प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक गोविंदा पथकासह स्पेन येथील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक वीला फ्रांका पथकाचे प्रतिनिधी दहा थर लावण्याचा विक्रम करणार असल्याची माहिती पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे.