भाईंदर : तब्बल १८ वर्षांनंतर मिरा भाईंदर शहरात राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, इतक्या प्रदीर्घ काळानंतर शहरात त्यांची हजेरी लागणार असल्याने अन्य पक्षात गेलेल्या त्यांच्या माजी सहकाऱ्यांकडून खंत व्यक्त केली जात आहे.

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज ठाकरे यांनी २००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मिरा भाईंदरसाठी पहिले शहरप्रमुख म्हणून अरुण कदम यांची नियुक्ती करण्यात आली होती. कदम हे शहरातील एक नावाजलेले मराठी व्यक्तिमत्त्व असल्यामुळे, त्यांच्या नेतृत्वाखाली २००७ च्या महापालिका निवडणुकीत पक्षाला प्रथमच चार नगरसेवक निवडून आणण्यात यश आले होते.

महत्त्वाची बाब म्हणजे, प्रेमनाथ पाटील हे एकमेव मराठी नगरसेवक वगळता, मधुसूदन पुरोहित, व्यास आणि गोपाळ शेट्टी हे अमराठी नगरसेवक होते. त्यावेळी ऑगस्ट २००७ रोजी राज ठाकरे यांची शहरात जाहीर सभा झाली होती.

पहिल्याच निवडणुकीतील यशामुळे पक्ष भविष्यात संघटनात्मक दृष्ट्या विस्तारेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राज ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे शहराकडे लक्ष दिले नाही, अशी खंत त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी तेव्हाच व्यक्त केली होती. त्याचा परिणाम असा झाला की, मागील १८ वर्षांत अरुण कदमांसह अनेक मुख्य पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकून इतर पक्षांत प्रवेश केला. २०१२ च्या निवडणुकीत मनसेला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही.

दरम्यान, आज १८ जुलै रोजी राज ठाकरे मिरा भाईंदरमध्ये उपस्थित राहणार असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू असून, त्यानिमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सध्या मनसेमध्ये पूर्वीच्या तुलनेत फारच थोडे पदाधिकारी शिल्लक राहिले आहेत. “राज ठाकरे यांनी सुरुवातीपासून मिरा भाईंदरकडे लक्ष दिले असते, तर आज परिस्थिती वेगळी असती,” अशी खंत पक्षाचे माजी कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.