वसई : राखीपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना टपालाने राख्या पाठवण्यासाठी अनेकांनी आज टपाल केंद्रात गर्दी केली आहे. पण, वसईतील अनेक टपाल केंद्राचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे राख्या पाठविणाऱ्या बहिणींना ताटकळत उभे राहावे लागले. तर अन्य नागरिकांची टपाली कामे खोळंबली.

येत्या ९ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. राखीपौर्णीमेसाठी अवघे दोन – तीन दिवस बाकी असताना घरापासून दूर किंवा परगावी राहणाऱ्या भावांना राख्या पाठवण्यासाठी बहिणींची लगबग सुरू आहे. अशातच दरवर्षी राख्या पाठवण्यासाठी बहुसंख्य लोक टपाल केंद्रात गर्दी करतात. पण, गेल्या काही दिवसांपासून वसईतील बहुतांश टपाल केंद्रातील सर्व्हर डाऊन असल्यामुळे राखी पाठवण्यासाठी तासनतास लोकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.

तसेच अनेकांना एका टपाल केंद्राचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे दुसऱ्या टपाल केंद्रात धावपळ करावी लागतेय. बुधवारी सकाळपासूनच वसई पूर्वेतील तसेच वसई पश्चिमेतील पापडी टपाल केंद्रासह बहुतांश ठिकाणच्या टपाल केंद्रातील सर्व्हर डाऊन आहेत. त्यामुळे सकाळी साडेसात आठ वाजल्यापासूनच वसईच्या विविध भागात राहणाऱ्या नागरिकांनी वसई पश्चिमेतील वसई रोड टपाल केंद्रात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

कामावर जाणारे तसेच ठराविक वेळ काढून राखी पाठवण्यासाठी आलेल्या नागरिकांना १ ते २ तास रांगेत उभं राहून वेळेअभावी माघारी परतावे लागत आहे. सकाळी ९ वाजल्यापासून मी फक्त राखी टपालाने पाठवण्यासाठी या रांगेत उभा आहे. पण तासभर उलटून गेल्यानंतरही माझा नंबर अजून आलेला नाही. काल सकाळीसुद्धा हीच परिस्थिती आणि आजही तेवढीच रांग आहे, अशी प्रतिक्रिया सुरेश जैन यांनी दिली.

सकाळी दहा वाजता पापडी टपाल केंद्रात गेले होते. पण तिथला सर्वर बंद असल्यामुळे त्यांनी मला बसेन टपाल केंद्रात जाण्यास सांगितले. पण, इथेही सर्व्हर डाऊन असल्यामुळे रांगेत उभं रहावं लागतंय अशी प्रतिक्रिया वैशाली माने यांनी दिली. वारंवार बंद पडणाऱ्या या सर्व्हर मुळे बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे टपाल केंद्राने या समस्येवर लवकरच काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

मागील तीन ते चार दिवसांपूर्वी टपाल विभागाची प्रणाली बदलली आहे. त्यामुळे अशा अडचणी येत आहेत. याबाबत वरिष्ठांना आम्ही कळविले आहे. ज्या ठिकाणी अडचणी येतात तिथेही आम्ही आमचे कर्मचारी देऊन सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत असे टपाल तक्रार निवारण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.