विरार :  टाळेबंदीच्या काळात कमी झालेल्या चोऱ्यांचे प्रमाण टाळेबंदीनंतर वाढताना दिसत आहे. केवळ १० महिन्यांत ३८५ घरफोडी आणि चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात विरार परिसरात सर्वाधिक १३८ घटनांची नोंद झाली आहे.  

वसई विरार परिसरात मागील काही दिवसांपासून चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. छोटय़ामोठय़ा चोऱ्यांपासून कडी-कोयंडा तोडून घरफोडय़ांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. शहरातील वाढते चोऱ्यांचे प्रमाण पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. टाळेबंदीच्या काळात नागरिक घरात असल्याने चोऱ्यांचे प्रमाण कमी होते. पण निर्बंध शिथिल झाल्याने नागरिक घराच्या बाहेर पडू लागले आहेत. त्यात सणांचे दिवस असल्याने अनेकजण आपल्या गावी गेले आहेत. याच गोष्टीचा फायदा चोरांनी घेत शहरात चोरीच्या घटनांचे सत्र चालवले आहे. 

त्यत करोना काळात वाढती बेरोजगारी आणि वाढती महागाई आणि हाताला काम नाही. परिणामी, जबरी चोऱ्या, किरकोळ चोऱ्या, घरफोडय़ांच्या याकडे अनेक तरुण वळले आहेत. पोलिसांनी उकल केलेल्या गुन्ह्यांतील अनेक आरोपी पहिल्यांना चोरी करताना आढळून आले आहेत. घरफोडय़ांसह चोऱ्यांच्याही प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या ३२ महिन्यांत शहरातील सात पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तब्बल १ हजार १४७ घरफोडय़ांच्या घटना घडल्या असून त्यापैकी केवळ ४४७ घरफोडयांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

त्यात पोलिसांनी नागरिकांना केलेल्या आवाहनाचे पालन होताना दिसत नाही. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,  इमारतींमध्ये सायरन, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर सुरक्षित ठेवला पाहिजे. चोरी करताना पुरावा मागे राहू नये म्हणून चोरटे डीव्हीआर चोरून नेतात. इमारतीच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक नेमावेत. बाहेरगावी जाताना सोने-चांदीचे दागिने ओळखीच्या व्यक्ती किंवा बँकेमधील लॉकरमध्ये ठेवावेत. घर बंद करून जाताना लॅच प्रकारातील कुलूपाचा वापर करावा. घरामधील एक दिवा सुरू ठेवावा त्यामुळे घरामध्ये कोणी आहे किंवा नाही याचा चोरास अंदाज येत नाही. मुख्य दरवाजा तसेच सर्व खिडक्या व दरवाजे यांचे ग्रिल मजबूत व बंद आहेत का, याची खात्री केली पाहिजे. गावी जात असल्याची माहिती शेजारच्या ओळखीच्या व्यक्तीला देऊन, घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावे. अशा सूचना वारंवार पोलिसांकडून देण्यात येत आहेत. पण या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. 

कोरोना काळात टाळेबंदीत महिन्यांत बहुतांश नागरिक घरीच राहिले. परिणामी, चोरटय़ांनी घरांऐवजी बंद दुकानांना लक्ष्य केले. पण हळूहळू टाळेबंदीनंतर नागरिक घराबाहेर पडले. त्यामुळे चोरटय़ांनीही दिवसा टेहळणी करून रात्रीच्या चोऱ्या केल्या. अनेक ठिकाणी दिवसाही घरफोडय़ांचे प्रकार झाल्याचे दिसून आले आहे. वाढलेल्या चोऱ्या व घरफोडय़ांचे सत्र यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.