Vasai Arnala Crime News विरार पश्चिमेच्या अर्नाळा येथे राहणाऱ्या येथे राहणाऱ्या एका कुटुंबावर सोमवारी पहाटे एका अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी गुरुवारी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा कक्ष ३ कडून ही कारवाई करण्यात आली आहे.

विरार पश्चिमेच्या अर्नाळा बंदरपाडा या गावात राहणाऱ्या गोवारी कुटुंबावर सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला होता. यात जगन्नाथ गोवारी (७६), लीला गोवारी (७२) आणि नेत्रा गोवारी (५२) गंभीररित्या जखमी झाले होते. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

याबाबत गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाकडून तपासाला सुरुवात करण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी ५०० हुन अधिक सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. दिपेश अशोक नाईक (२९) असे आरोपीचे नाव असून तो मुंबई येथे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करत होता. आरोपी हा अर्नाळ्याच्या बंदरपाडा येथील रहिवासी असून कर्जबाजारी झाल्याने चोरी करण्याच्या उद्देशाने त्याने गोवारी कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

नाईक याने काही व्यक्तींची आर्थिक फसवणूकही केली असून त्याच्यावर ४० ते ५० लाखांचे कर्ज होते माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष ३ चे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस उपनिरक्षक रामचंद्र पाटील आदींच्या पथकाने केली.