वसई : वसई विरार शहरात पालिकेने वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व सुरळीत वाहतूक करता यावी यासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा अधूनमधून बंदच होत असल्याने सिग्नल यंत्रणेचा बोजवारा उडू लागला आहे.
मागील काही वर्षापासून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरात वाहनांची संख्या देखील वाढू लागली आहे. वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून वसई विरार शहरात महापालिकेच्या वतीने सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा अनेकठिकाणी बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सिग्नल यंत्रणा बंद असल्याने एकाच वेळी अनेक ठिकाणच्या गाड्या एकत्रित आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी सिग्नल जवळच जाहिरात फलक लावले जात असल्याने सिग्नल दिसून येत नाही अशीही स्थिती निर्माण होत आहे. पालिकेच्या क्षेत्रात वसई पूर्व, पश्चिम, नालासोपारा, विरार, अंबाडी रोड, एव्हरशाईन, चिमाजी आप्पा परिसर, माणिकपूर अशा विविध १६ ठिकाणी सिग्नल यंत्रणा सिग्नल यंत्रणा कार्यन्वित आहे. यांची देखभाल दुरुस्ती ही वेळच्या वेळी होणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सिग्नल यंत्रणा ही अधूनमधून बंद होते.
वसई पश्चिमेच्या ६० फूटी रस्त्यावर या बस थांब्याशेजारील वाहतूक सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून अधूनमधून बंद पडत असल्यामुळे येथे रोजच वाहतुकीची कोंडी होत असून, वाहनचालकांमध्ये क्षुल्लक कारणांवरून वाद होण्याच्या घटना वाढल्या असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. काही वेळा वीज जाणे, तांत्रिक अडचण यामुळे सिग्नल यंत्रणा बंद होते असे पोलिसांचे म्हणणे आहे.