लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर: मिरा रोड येथे मध्यरात्री दुचाकीने स्टंटबाजी करण्याऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. स्टंटबाजी करणारा दुचाकीस्वार फरार झाला असून काशिगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजेश लुहार (१९) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो मिरा रोडच्या हाटकेश परिसरात रहात होता. एका खासगी कंपनीत तो काम करत होता.

शनिवारी मध्यरात्री मिरा रोड पूर्वेच्या काशिवाग येथे जेपी इन्फ्रा बँक रस्त्यावर दोन दुचाकीस्वार स्टंटबाजी करत होते. त्याचवेळी राजेश लुहार (१९) हा तरुण तेथून जात होता. या दुचाकीस्वाराने (एमएच ४६ एम ७६१६) त्याला जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी धाला. त्याच्या डोक्याला आणि पोटाला दुखापत झाली. त्याला भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. राजेशचा मोठा भाऊ दीपक लुहार याने याबाबत काशिगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.तर या प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात आली असून लवकरच त्याला अटक केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बंधू केसरे यांनी दिली आहे. राजेश हा एका कंपनीत काम करत होता.

आणखी वाचा-वसई : प्रवाशाने घेतला सुरक्षा बलाच्या जवानाचा चावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टंटबाजांचा सुळसुळाट

मिरा भाईंदर शहरातील मोकळ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनावर स्टंटबाजी करणारे चालक दिसून येत आहेत. यात जे. पी इन्फ्रा, सेवेन इलेवेन क्लब रोड, मिरा रोडचा बॅक रोड आणि इंद्र लोक येथील रस्त्याचा समावेश आहे.काही दिवसापूर्वीच दुचाकीवर उलटे बसून गाडी चालवणाऱ्या चालकाची चित्रफित संपूर्ण राज्यात वायरल झाली होती.तरी देखील वाहतूक पोलिसांनी अशा स्टंटबाजी करणाऱ्यांना आटोक्यात न आणल्यामुळे असे अपघात घडत असल्याची तक्रार सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.