वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पेल्हार येथे सुर्या योजनेतून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे उंचच फवारे उडत असून लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला लागूनच सुर्या योजनेच्या जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्या जलवाहिनीतूनच वसई विरार शहराला पाणी वितरण होते. मात्र गुरुवारी पेल्हार येथील राशीद कंपाऊंड जवळ रस्ते दुरुस्तीचे काम सुरू असतानाचा त्या वाहिनीला धक्का लागला आणि ती जलवाहिनी फुटली असल्याचे समजते आहे.

जलवाहिनी फूटल्याने पाण्याचे उंच उंच फवारे उडत होते. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे. पाण्याच्या फवाऱ्यामुळे या महामार्गावर वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते. पाणी पुरवठा विभागाला याची माहिती मिळताच तातडीने जलवाहिनी बंद करण्यात आली आहे. व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.