वसई: वसई विरार शहरातील वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या २११ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर होऊन पाच महिने उलटून गेले आहेत. अजूनही या कामाची निविदा प्रक्रिया ही पूर्ण न झाल्याने वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा प्रश्न रेंगाळला आहे.वसई विरार शहरात महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. वाढत्या लोकसंख्येमुळे विजेची मागणी वाढली आहे.सद्यस्थितीत महावितरण कडून साडे दहा लाखाहून अधिक वीज ग्राहकांना वीज पुरवठा होतो.
महावितरणने वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत खांब उभारून त्यावर विद्युत वाहिन्या विस्तारल्या आहेत. खांबावरील विद्युत तारांचे प्रमाणात अधिक भार झाल्याने अनेक ठिकाणच्या भागात विद्युत वाहक तारा लोंबकळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या लोंबकळत असलेल्या तारांचा अतिउच्च दाबाने किंवा हवेच्या वेगाने तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन आगीच्या ठिणग्या बाहेर पडणे असे प्रकार सातत्याने होत असतात.तर काही ठिकाणी तारा फारच जुन्या झाल्याने सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतात.
विशेषतः वादळीवारे व पावसाच्या दिवसात मोठ्या प्रमाणात विद्युत वाहक तारा तुटून जातात. त्याचा फटका महावितरण सह वीज ग्राहकांना बसतो. मागील काही वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या तौक्ते वादळाने किनारपट्टीच्या भागाची अक्षरशः दैना केली होती. सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी वीज वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी करण्यात येत होती.
तर वीज वाहिन्या भूमिगत नसल्याने या भागात निर्माण होत असलेल्या अडचणी संदर्भात येथील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी ही पाठपुरावा केला होता.यानुसार २११.५५ कोटींचा सुधारित प्रस्ताव महावितरणच्या कल्याण परिमंडळाने आपत्ती व्यवस्थापन संचालक मुंबई यांच्याकडे तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला होता.
मार्च महिन्यात या प्रस्तावाला नैसर्गिक आपत्ती सौम्यीकरण योजनेतून शासनाने मंजुरी देऊन या कामासाठी २११ कोटी ५४ लाख ८२ हजार इतका निधी मंजूर केला आहे. याबाबत शासनाने परिपत्रक काढून १८ महिन्यात हे काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रस्ताव मंजूर होऊन पाच महिने उलटून गेले तरीही अजूनही या कामाला गती मिळाली नसल्याने वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव रेंगाळला असल्याची प्रतिक्रिया वीज ग्राहकांनी दिली आहे.
वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी केवळ घोषणा केल्या जातात मात्र प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने दुर्घटनांचा धोका वाढत आहे असे नागरिकांनी सांगितले आहे.
भूमिगत अंतर्गत असलेली कामे
महावितरणच्या वसई मंडळाच्या मार्फत ही कामे केली जाणार आहेत. यात १६४ किलोमीटरची उच्च दाब वाहिनी भूमिगत केली जाणार आहे. तर ६९१ किलोमीटर पर्यंतच्या लघुदाब वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. तर वीज पुरवठा करण्यासाठी जागोजागी सुमारे १ हजार ९७६ फिडर पिलर यासह ३६३ आर एम यु बसविले जाणार आहेत असे महावितरणने सांगितले आहे.
वीज तारा व खांब धोकादायक स्थितीत
वसई विरार शहरात विविध ठिकाणी वीज खांब व तारा अक्षरशः धोकादायक स्थितीत आहेत. यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी वीज तारांचा गुंता झालेला असतो त्यामुळे ही वीज पुरवठ्या दरम्यान अडचणी येतात. तर काही ठिकाणी विजेचे खांब ही वाकलेल्या स्थितीत असतात अशा वेळी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्या कामाच्या निविदा प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात केली जाणार आहे.-संजय खंडारे, अधीक्षक अभियंता महावितरण वसई