वसई : वसईच्या विरार परिसरातून लांब पल्याच्या ठिकाणी प्रवासासाठी वसई रेल्वे स्थानकात टर्मिनस तयार करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. अभियांत्रिकी आराखडे व संरचना आराखडे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
मागील काही वर्षापासून वसई विरार शहराचे नागरीकरण वाढत आहे. विशेषतः वसई विरार परिसरातून लांब पल्याच्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. वसई विरार मधून मोठ्या संख्येने प्रवासी इतर राज्यात प्रवास करत असतात. परंतु सद्यस्थितीत येथील नागरिकांना दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी वांद्रे, कुर्ला, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे सामानाचे ओझे सोबत घेऊन प्रवास करावा लागतो.
यासाठी वसई रोड रेल्वे स्थानकात टर्मिनस बनवावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवासी करत आहेत. मध्यंतरी रेल्वेने टर्मिनसच्या कामाची घोषणा करून सहा वर्षे उलटून गेली तरीही अजूनही या कामाला गती मिळत नसल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती.
पश्चिम रेल्वेने टर्मिनसचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्यक्षात कामालाच सुरुवात झाली नसल्याने गती मिळावी यासाठी वसईतील नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत लोकप्रतिनिधींसोबतच सामाजिक कार्यकर्ते जॉय फरगोस यांनीही पत्रव्यवहार केला होता. वसईच्या परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने टर्मिनस हे अत्यंत महत्त्वाचे आहे मात्र शासन स्तरावर योग्य त्या हालचाली होत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली होती. अखेर रेल्वे प्रशासनाने टर्मिनस तयार करण्यासाठी आवश्यक असलेले संरचना आरखडा व अभियांत्रिकी आराखडा तयार करण्याच्या कामाला गती देऊन त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती रेल्वेने पत्राद्वारे दिली आहे.
लवकरच निविदा प्रक्रिया
‘वसई रोड प्लॅटफॉर्म व टर्मिनस विकास’ या कामाला १७ मार्च २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी अभियांत्रिकी आराखडे आणि संरचना आराखडे तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.अंदाजपत्रक व निविदा दस्तऐवज तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरु असून ती अंतिम टप्प्यात आहे. प्रक्रिया पूर्ण होताच निविदा काढण्यात येणार असून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल अशी माहिती रेल्वेने दिलेल्या पत्रकात सांगितले आहे.
प्रवाशांच्या अडचणी काय ?
वसई विरार मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. लांब पल्याच्या गाड्यांनी प्रवास करण्यासाठी मुंबई परिसरातील रेल्वे स्थानकात जावे लागते. परंतु काही वेळा तिथे सामानासह जाताना अडचणी येतात. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते अशा वेळी बॅगा, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व अन्य साहित्य घेऊन चढणे शक्य होत नाही. तर काही वेळा दूरच्या प्रवासातून घरी परतत असताना ही असाच त्रास सहन करावा लागतो असे प्रवाशांचे म्हणणे आहे. यासाठी रेल्वे स्थानकात टर्मिनस होणे आवश्यक आहे असे प्रवाशांनी सांगितले आहे.