भाईंदर : ठाणे-घोडबंदर मार्गाचे डांबरीकरण करण्यासाठी ११ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत जड आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचे आदेश मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आले आहेत. गेल्या चार महिन्यांत या रस्त्याची तिसऱ्यांदा दुरुस्ती केली जात असल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
ठाण्याच्या घोडबंदर मार्गावरील गायमुख ते वर्सोवा चौक पर्यंत(फाउंटन हॉटेल) सुमारे साडेचार किलोमीटर लांबीचा रस्ता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मिरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेवर आहे.
दरम्यान, या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने आणि रस्त्याची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी वारंवार प्रवाशांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे हा रस्ता व्यवस्थित करण्यासाठी महापालिकेकडून डांबरीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कामासाठी ११ ऑक्टोबर रात्री दहा वाजल्यापासून ते १४ ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत या मार्गावरून जड-अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. या संदर्भातील अधिसूचना शुक्रवारी पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आली आहे. दरम्यान, या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.
तिसऱ्यांदा दुरुस्ती
ठाणे-घोडबंदर मार्गावर खड्ड्यांची समस्या कायम आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेने या मार्गाचे डांबरीकरण केले होते. मात्र, काही दिवसांतच पुन्हा खड्डे निर्माण झाले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात प्रशासनाने पुन्हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवून दुरुस्ती केली. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याचा पुन्हा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला. परिणामी आता पुन्हा या रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले असून प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
असा करावा प्रवास
-शिरसाट फाटाहून गणेशपुरी आणि चिंचोटी-खरबाव मार्गे प्रवास करता येईल.
-गुजरातहून येणाऱ्या वाहनांना मनोर-वाडा नाका मार्गे पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन.
-ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांना वाय जंक्शनहून सरळ नाशिक रोडने मानकोली मार्गे जाण्याचे निर्देश.