वसई:विरार परीसराचा दळणवळण प्रश्न मार्गी लागावा व वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी नरिंगी उड्डाणपूल करण्याचे काम हाती घेतले आहे. काम सुरू होऊन चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही उड्डाणपूल पूर्ण झाले नसल्याने अजूनही या भागातील नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. वाढत्या नागरिकरणा दृष्टीने शहरातील विविध रस्ते व उड्डाणपूल तयार करून दळणवळण सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर विरार जवळील नारिंगी विरार पूर्व व पश्चिम जोडता यावे यासाठी उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नारिंगी उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा ७२५ मीटर लांबीच असून १४ मीटर रुंद आहे. यासाठी २४ कोटीं रुपये खर्च केला जाणार आहे. मात्र मागील चार ते पाच वर्षापासून विविध प्रकारच्या अडचणीमुळे या पुलाचे काम पूर्ण होऊ शकले आहे. मात्र याचा फटका आता नागरिकांना बसू लागला आहे.

दिवसेंदिवस विरारच्या भागात नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने ये जा करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. जेव्हा रेल्वे फाटक पडते तेव्हा तर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. पूर्व पश्चिम असा प्रवास करण्यासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा असून पूल सुरू झाल्यास लाखो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. यासाठी रखडलेले काम तातडीने पूर्ण करून दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नारिंगी पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत ८० टक्के काम आम्ही पूर्ण केले आहे. उर्वरित काम मार्गी लागावे यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच ते काम पूर्ण होईल.- प्रशांत ठाकरे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम

८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा

सद्यस्थितीत या पुलाच्या विरार पश्चिमेच्या भागातील उतार मार्ग पूर्ण झाला आहे. तर पूर्वेच्या भागातील काम प्रगतीपथावर आहे. दुसरीकडे पुलाच्या मध्ये येत असलेल्या जलवाहिन्या हलविण्याचे काम सुरू असून त्यासाठी पालिकेला १.२५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. आतापर्यंत जवळपास ८० टक्के इतके काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच मार्गी लावले जाईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारीअभियंता प्रशांत ठाकरे यांनी सांगितले आहे.

रेल्वेचे काम अपूर्ण

पुलाच्या रेल्वेच्या भागातील काम रेल्वे कडून करण्यात येणार आहे. मात्र अजूनही हे काम पूर्ण झाले नसल्याने पुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. रेल्वेचे काम करताना त्यांना मेगा ब्लॉक घेऊन काम करावे लागणार आहे. जेव्हा रेल्वेचे काम पूर्ण होईल तेव्हा पुलाचे पुढील काम पूर्ण होण्यास मदत होणार आहे. याशिवाय रेल्वेकडून कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहकार्य मिळाले नसल्याने कामात अडचणी आहेत असेही सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे.

पाचशे मीटर अंतरासाठी तास भराचा फेरा

विरार उड्डापुल आहे त्यावरूनही केवळ हलक्या वाहनांना प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे अवजड वाहनांना नारिंगी फाटक मार्गे वळसा घेऊन जावे. परंतु तेथे निर्माण होणाऱ्या कोंडीमुळे पाचशे मीटर चे अंतर कापण्यासाठी जवळपास अर्धा ते एक तास वेळ लागतो असे प्रवाशांचे म्हणणे आहे.