वसई: महाराष्ट्र सरकारकडून महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांचे केले जाणारे खाजगीकरण आणि पुनर्रचनेविरोधात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. यात वसईतील ६० ते ६५ टक्के कर्मचारी सहभागी झाले असून वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, शहरातील वीजपुरवठा सुरळीत राहावा म्हणून पर्यायी व्यवस्था आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवली असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या खाजगीकरण आणि पुनर्रचनेच्या निर्णयविरोधात महाराष्ट्रभरात महावितरणच्या २३ पैकी ७ संघटनांनी संप पुकारला आहे. ९ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान हा संप सुरू राहणार आहे. यात वसईतील महावितरणमधील स्थायी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. विविध मागण्यांसाठी वसई पूर्वेतील महावितरण कार्यालयासमोर हा संप पुकारण्यात आला आहे.

यात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपन्यांमध्ये केली जाणारी कर्मचाऱ्यांची पुनर्रचना आणि महानिर्मितीच्या अंतर्गत येणारे जलविद्युत प्रकल्प,  महापारेषणच्या अंतर्गत येणाऱ्या टॅरिफ आधारित स्पर्धात्मक बोली (TBCB) खाजगीकरणाला विरोध, महावितरणच्या ३२९ उपकेंद्रांचे खाजगीकरण,  समांतर वीज परवान्याला विरोध, राज्य सरकारने लागू केलेल्या पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदांची भरती अशा विविध मागण्या कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत.

२२ सप्टेंबरपासून आम्ही सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहोत. कृती समितीशी चर्चा करूनही आमच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा न निघाल्यामुळे तीन दिवसीय संप आम्ही पुकारला आहे. तसेच ही महावितरण कोणत्याही भांडवलदाराकडे जाऊ नये म्हणून आमचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया वसई सर्कल सचिव संजय तिडके यांनी दिली आहे. तर गेल्या १० ते १५ वर्षांपासून आम्ही कामण येथे स्वीचिंग सेंटर उभारण्यासाठी तुंगारेश्वर पट्ट्यातील जागा मागतोय. पण, आम्हाला ती मिळाली नाही. मात्र एका खाजगी कंपनीला वीजनिर्मितीसाठी अगदी लगेच ती जागा देण्यात आली. जे अत्यंत चुकीचं असल्याचं महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत परिमंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी म्हटले आहे.

वीजपुरवठ्यावर परिणाम नाही

तीन दिवसाच्या संपदरम्यान वसई विरार मधील वीजपुरवठावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या दरम्यान आपत्कालीन व्यवस्था उभारण्यात आला असून विविध एजन्सींकडून काम करणारे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच महावितरणचे ११३ विद्युत सेवक, चार ते आच अभियंते देखील कार्यरत आहेत. शहरातील ३० उपकेंद्रांवरही कर्मचारी उपस्थित असणार आहे असे महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले आहे.

तसेच शहरात वीज खंडित होण्याची परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी लागणाऱ्या विद्युत तारा तसेच उपकरणे तयार ठेवण्यात आली आहेत. तसेच वीजपुरवठ्या संबंधीत काही तक्रारी असल्यास नागरिकांना संपर्क साधता यावा यासाठी टोल फ्री क्रमांक सुद्धा जारी करण्यात आला आहे. ७८७५७६०६०२ या टोल फ्री क्रमांकावर नागरिक संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात.