वसई:  वसई विरारमधील विविध ठिकाणच्या गावात गौरी गणपती विसर्जन मिरवणुकीची परंपरा अजूनही जोपासली जात आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी ‘एक गाव, एक मिरवणूक’ काढून गणरायाला व गौरींना भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात याला. यावेळी गावकऱ्यांच्या एकोप्याचे दर्शन यातून घडले.

गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक म्हणजे कर्णकर्कश संगीत, चित्रपट गीतांवर धांगडधिंगा, वाहतूक कोंडीचे चित्र दिसून येते. अशा स्थितीत शहरातील अजूनही विविध ठिकाणच्या भागात पारंपारिक पद्धतीने मिरवणुक काढली जात आहे. विशेषतः  नायगाव पूर्वेच्या जूचंद्र गावात ही मागील १४३ वर्षांपासून ‘ एक गाव एक मिरवणूक व एकच सामुदायिक आरती’ हा उपक्रम धार्मिक सेवा मंडळ यांच्या मार्फत राबविला जात आहे.

मंगळवारी हीच परंपरा कायम ठेवत श्री दत्तमंदिर येथून एकाच वेळी टाळ मृदुंगाच्या व विविध गणेश गीतांच्या सुरात गौरी-गणपतीची मिरवणकू निघाली होती.गल्लीगल्लीतले एक – एक गौरी गणपती त्यात मिरवणूकीत सहभागी होऊ लागले. एका रांगेत निघालेली मिरवणूक, टाळ मृदुंगाचा स्वर त्यानंतर गावच्या तलाव पालीवर सामुदायिक आरती यामुळे भक्तिमय वातावरण तयार झाल्याचे दिसून आले.

तर विरार पूर्वेच्या खानिवडे येथे पारंपरिक प्रथेनुसार मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी भजन, टाळ, मृदुंग, पारंपरिक गीते तसेच पारंपारिक नृत्य करीत गणेश भक्त यात सहभागी झाले होते. तसेच यावेळी कामण, मालजीपाडा यासह इतर गावात ही पारंपरिक विसर्जनाचा उत्साह दिसून आला.

परंपरा जोपासण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन

वसई विरार शहराचे नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवात गणेश मूर्तींची संख्या वाढली आहे. मात्र स्थलांतर करून आलेले नागरिक गावच्या परंपरेचे पालन करीत नाहीत. त्यामुळे नियमानूसार विसर्जन होण्यात अडथळे निर्माण होतात. आता तरुणांनी सुद्धा बदलत्या काळाच्या ओघात आपली संस्कृती व परंपरा अबाधित राहावी यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन गावातील ज्येष्ठ नागरिकांनी केले आहे.