विरार : विरार पश्चिमेच्या जुने विवा महाविद्यालय परिसरात सिग्नल यंत्रणा नसल्याने दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत असते. तसेच भरघाव येणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे ही जीवघेणे झाले आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
विरार पश्चिमेला असणाऱ्या जुने विवा महाविद्यालय परिसरात चार रस्ते एकत्र येतात. जकात नाका ते ग्लोबल सिटी रस्ता, विरार पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल येथील वाहतूक याच परिसरातून होत असते. यामुळे हा रस्ता सतत गजबजलेला असतो. शेजारीच असणाऱ्या शाळेमुळे दुपारच्या वेळेत इथे मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. अशावेळी सिग्नल यंत्रणा नसल्याने चारही बाजूने वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवत असल्याचे दिसून येते. तसेच अशा वाहतूक कोंडीतून विद्यार्थ्यांना आणि पालकांना रस्ता ओलांडणे अवघड होते.
संध्याकाळच्या वेळेतही या रस्त्यांवरून भरघाव वेगाने वाहने येत असतात अशावेळी नागरिकांना त्यातही ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडणे भाग पडते. अनेकदा नागरिकांना रस्त्याच्या मधोमध थांबून राहावे लागते. अशावेळी अपघातांची शक्यता निर्माण होते. त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी नियुक्त केले जातील असे वाहतूक पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी सांगितले आहे.
कुठल्याही वेळेत हा रस्ता ओलांडणे धोकादायकच असते. सिग्नल नसल्याने वाहने थांबत नाहीत. विद्यार्थीही मोठया प्रमाणावर इथून जात असतात. इथे सिग्नल यंत्रणा अथवा पादचारी पूल असणे गरजेचे आहे. – प्रतीक तावडे, नागरिक
नवीन विवा महाविद्यालयात जाणारे हजारो विद्यार्थी जुने विवा महाविद्यालय येथून रस्ता ओलांडून जात असतात. सिग्नल यंत्रणा नसल्याने घोळक्याने रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो.