Mumbai Ahmedabad National Highway Traffic Jam ठाणे- घोडबंदर मार्गावर रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. या वाहतुकीचा परिणाम हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झाला असून  सोमवारी सुद्धा वर्सोवा पूल ते वसई या दरम्यान वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या कोंडीचा परिणाम हा शहरांतर्गत असलेल्या रस्त्यावर दिसून आला. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे.

ठाणे-घोडबंदर मार्गावरील घाट मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था  बनली आहे.  सातत्याने दुरुस्तीनंतर ही मोठं मोठे खड्डे पडले आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर पर्यंत हे दुरुस्तीचे काम चालणार आहे. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक ही चिंचोटी भिवंडी व अन्य पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे.  या रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे वाहनांच्या रांगा या थेट राष्ट्रीय महामार्गापर्यंत येत आहेत. त्यामुळे  वर्सोवा पुलापासून ते चिंचोटी, वसई फाट्यापर्यंत वाहनांच्या दहा ते बारा किलोमीटर लांब रांगा लागू लागल्या आहे. सोमवारी सकाळी सुद्धा कोंडीची समस्या कायम असल्याने कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे शालेय बसेस, रुग्णवाहिका यांना ही याचा फटका बसत.

दुरुस्तीचे काम करताना याचे नियोजन योग्य होत नाही त्याचा परिणाम हा सातत्याने दिसून आला आहे. विशेषतः अवजड वाहनांना बंदी असतानाही अशी वाहने मध्येच येतात त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे प्रवासी निलेश पगारे यांनी सांगितले आहे.

चिंचोटी महामार्ग पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणाचे काम  सुरू आहे. मात्र काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने टाकत असल्याने दुहेरी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता नागरिकांनी महामार्गाऐवजी अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केला आहे.

शहरांतर्गत रस्त्यावर कोंडी

राष्ट्रीय महामार्गावर निर्माण झालेल्या कोंडीमुळे वसई विरार येथील वाहनचालकांनी भोयदापाडा, नायगाव, सातीवली मार्गे जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. नायगाव- बापाणे रस्त्यावर ही कोंडी झाली होती. या कोंडीमुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांना वेळेत बस व ऑटोरिक्षा न मिळाल्याने त्रास सहन करावा लागला. तर काहींना एक ते दीड तास रिक्षासाठी उभे राहावे लागले असे नागरिकांनी सांगितले आहे.

स्थानिकांची कोंडी

महामार्गालगत बापाणे, मालजीपाडा, ससूनवघर, बोबतपाडा, पठारपाडा, ससूपाडा असे गावपाडे आहे. महामार्ग हा या नागरिकांचा ये जा करण्याचा प्रमुख मार्ग आहे. मात्र निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे येथील नागरिक प्रशांत पाटील यांनी सांगितले आहे

रोरो सेवेवर ताण

मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहनचालकांनी वसई-भाईंदर रो रो सेवेचा पर्याय निवडला. मात्र यामुळे रो रो सेवेवरील ताण वाढून वसई किल्य्यातील रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सलग दुसऱ्या दिवशीही हीच स्थिती कायम होती.