तिसऱ्या लाटेपूर्वी खासगी रुग्णालयांना सूचना; उपाययोजना न केल्यास कारवाईचा इशारा
भाईंदर : संभाव्य तिसऱ्या लाटेचा गंभीर फटका मीरा भाईंदर शहराला बसू नये म्हणून रुग्णालयातील प्राणवायूचा साठा तीन पटीने वाढवण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून खाजगी रुग्णालयाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसात या संदर्भात उपाय योजना न आखल्यास त्या रुग्णालची कोविड मान्यता रद्द करण्यात येणार आहे.
करोना आजाराच्या दुसऱ्या लाटेचा गंभीर फटका मीरा भाईंदर शहराला बसला आहे. त्या काळात कारोना बाधित रुग्णांना शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात खाटा उपलब्ध करणे कठीण झाले होते, तर रुग्णालयात प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक रुग्ण दगावले गेले. त्यामुळे अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलण्यात येत आहे. याकरिता शुक्रवारी पालिका मुख्यालयात शहरातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टराची बैठक घेण्यात आली.
गुरुवारी समोर आलेल्या अहवालानुसार २५ नवे करोना बाधित समोर आले असून एकूण बाधितांचा आकडा ५१ हजार ५६८ वर जाऊन पोहचला आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण मृताचा आकडा १ हजार ३४७ इतका झाला आहे. त्यामुळे हळूहळू रुग्णांची वाढती ही रुग्णसंख्या प्रशासनाच्या चिंतेचा विषय ठरत आहे.
याकरिता अधिकाधिक उपाययोजना आखण्यात प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. सध्य स्थितीत शहरात एकूण ४० रुग्णालयांना कोविड रुग्णालयाची मान्यता देण्यात आली आहे.
या रुग्णालयांना आपल्या रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा तीन पटीने प्राण वायूचा साठा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच यावर पारख ठेवण्याकरिता सहा डॉक्टराची समिती तयार करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात या संदर्भात खाजगी रुग्णालयांनी आवश्यक योजना न आखल्यास त्या रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द करण्यात येणार असल्याच्या सूचना अतिरिक्त विजय कुमार म्हसाळ यांनी दिल्या.
करोना आजाराच्या तिसऱ्या लाटेचा गंभीर परिणाम होऊ नये म्हणून उपाययोजना आखण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. यात प्राणवायू अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्या पूर्वतयारीकरिता आम्ही भर देत आहोत. त्यामुळे नागरिकांनी देखील गाफील न राहता नियमांचे पालन करून काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
– डॉ.नंदकुमार लहाने, साथ रोग आणि हिवताप मुख्य अधिकारी (आरोग्य विभाग)