वसई : वसई विरार शहरात दिवाळीच्या पहिल्याच दिवसापासून आगींचे सुरू झालेले सत्र दुसऱ्या दिवशीही सुरूच असल्याचे दिसून आले. मंगळवारी संध्याकाळी नालासोपारा येथे एका चप्पल दुकानांना तर विरारमध्ये एका चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे. वसई विरार शहरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. आतषबाजी, रोषणाईच्या झगमगाटात शहर न्हाऊन निघाले असताना शहरातील विविध भागात एकामागून एक आगीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

नालासोपारा पूर्वेतील रेल्वे स्थानक परिसरात साई बाजार आहे. या बाजारात असणाऱ्या तीन ते चार दुकानांना मंगळवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात पसरलेल्या धुरामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. तसेच या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीसुद्धा झाली होती. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, फटाक्यांमुळे दुकानांना आग लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर या आगीत दुकानातील सामान पूर्णतः जळून गेल्यामुळे दुकानचालकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.

कारवाईनंतरही दुकाने सुरूच

नालासोपारा पूर्वेतील रेल्वे स्थानक परिसरात या आधीही दुकानांना आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भागातील दुकानांवर कारवाई केली होती. पण, त्यानंतरही स्थानक परिसरात दुकाने सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विरारमध्ये चारचाकीला लागली आग

विरार पश्चिमेतील जकात नाका परिसरात हुंडई क्रेटा या चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. वाहन बंद असल्यामुळे त्यांनी वाहनाची काच फोडून वाहनाच्या आत लागलेली आग विझवली आणि त्यानंतर वाहनमालकाला वाहन सुपूर्द केले.