वसई : अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी आरोपी शिझान खान याचा जामीन अर्ज शुक्रवारी वसई सत्र न्यायालयाने फेटाळल्याने त्याचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आता जामिनासाठी सोमवारी उच्च न्यायालयात शिझानच्या वकिलांमार्फत दाद मागितली जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणात शिझानच्या आईची भूमिका संशयास्पद असून तिला देखील आरोपी बनवण्याची मागणी तुनिशाच्या वकिलांनी केली.
तुनिशा शर्मा आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानच्या जामीन अर्जावर शुक्रवारी पुन्हा सुनावणी झाली. तुनिशाला शेवटचा भेटणारा व्यक्ती शिझान होता त्यामुळे तपासावर परिणाम होणार असल्याने त्याला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद तुनिशाचे वकील तरुण शर्मा यांनी केला. न्यायालयाने तो मान्य करत जामीन अर्ज फेटाळला. या निर्णयाला आव्हान देत जामिनासाठी सोमवारी उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे शिझानचे वकील शैलैंद्र मिश्रा यांनी सांगितले. तुनिशा आत्महत्येपूर्वी जे औषध घेत होती त्यामुळेच ती अधिक नैराश्यात गेली आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. हे औषध शिझानच्या आईच्या सांगण्यावरून ती घेत होती. तसेच आत्महत्येपूर्वी शिझानच्या आईने तुनिशाला दूरध्वनी केला होता, असे तुनिशाचे वकील तरुण शर्मा यांनी सांगितले. शिझानच्या आईची भूमिका संशयास्पद असून तिला या गुन्ह्यात सहआरोपी करावे, असे वकिलांनी सांगितले.