वसई- वीज देयकांचा त्वरीत न भरणा केल्यास वीज पुरवठा खंडीत केला जाईल असा बनावट संदेश पाठवून सायबर भामटे नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असतात. नालासोपारा येथे असाच संदेश पाठवून एका इसमाला तब्बल सव्वा दोन लाखांचा गंडा घातला आहे.

नालासोपारा येथे राहणारे कालीपदो पुरकाईत (५८) यांना काही दिवसांपूर्वी एका अनोळखी व्हॉटसअप क्रमांकावरून संदेश आला होता. तुमच्या वीज देयकाचा भरणा झालेला नसून त्वरीत देयकाची रक्कम न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्यात येईल, असे या संदेशात म्हटले होते. मात्र पुरकाईत हे नियमित वीज देयक भरत होते. त्यांनी त्या क्रमांकावर फोन केला. तेव्हा तुमचे वीज देयक हे अपडेट होत नसल्याने शंभर रुपये भरून ते अपडेट करावे लागेल असे सांगण्यात आले. यावेळी पुरकाईत यांना एक लिंक पाठवून त्यावर १०० रुपये भरण्यास सांगण्यात आले. यावेळी पुरकाईत यांची दिशाभूल करून त्यांच्या बॅंक खात्याचे तपशील घेऊन त्यामधील ३ लाख ३४ हजार रुपये लंपास करण्यात आले. या प्रकरणी पुरकाईत यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाकल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणूकीचे कलम ४२० तसेच माहिती तंत्रज्ञान अघिनियमाच्या कलम ६६ सी आणि ६६ डी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा बोरीवली येथील एमएचबी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>धुळवडीच्या दिवशी समुद्रात बुडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

महावितरण अशा प्रकारचे संदेश कुणाला पाठवत नाही. त्यामुळे ग्राहकांनी महावितणाशी संपर्क साधावा किंवा अधिकृत संकेतस्थळावरूनच देयकांचा भरणा करावा असे आवाहन महावितरणाने केेले आहे. पोलिसांनी देखील सायबर भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या बॅंकेचे तपशील, ओटीपी कुणाला देऊ नये असे पोलिसांना सांगितले. तरी जर फसवणुक झाल्यास तात्काळ  १९३० या हेल्पलाई क्रमांकावर किंवा सायबर पोलिसांच्या संकेतस्थळावर तक्रार करावी असे सांगितले. ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा घडल्यानंतर तात्काळ तक्रार केल्यास फसवुकीची रक्कम गोठवून परत मिळवून देता येऊ शकते असे पोलिसांनी सांगितले.