वसई : ऐन दिवाळीचा सण उत्साहात सुरू असताना वसईच्या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसाचा फटका वसईतील शेतकऱ्यांना बसला असून शेतकऱ्यांच्या भातपिकांचे नुकसान झाले आहे. वसईच्या पूर्व व पश्चिम पट्ट्यातील भागात यावर्षी ७ हजार १०९ हेक्टर क्षेत्रात भात पिकांची लागवड करण्यात आली होती. बहुतांश भागात भाताची कणसे चांगल्याप्रकारे कापणीसाठी तयार झाली असून काहींनी कापणीसाठीही सुरवात केली होती.

मात्र दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वसईच्या काही भागात पावसाने  हजेरी लावली होती. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कापणीसाठी तयार झालेली भाताची कणसे आडवी झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. तर निम गरवे आणि हलव्या भाताची काहींनी कापणी सुद्धा केली होती. त्यांचेही भात पिके भिजून गेल्याने नुकसान झाले आहे. पावसाचे सावट काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही
 
अधूनमधून अवकाळी पाऊस सुरूच आहे. त्याचा मोठा परिणाम भात शेतीवर होऊ लागला आहे. जर पावसाचे सत्र असेच सुरू राहिले तर जे काही उत्पादन निघाले आहे ते सुद्धा वाया जाईल असे एका शेतकऱ्याने सांगितले आहे. शेतजमिनीतील ओलावा कायम कापणी केलेले भाताची कणसे पुन्हा रुजण्याची ही भीतीही व्यक्त केली जात आहे. ज्यांचे अवकाळी झालेल्या पावसामुळे नुकताच झाले आहे त्यांचे पंचनामे करून योग्य ती मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

यापूर्वी ७७५ शेतकऱ्यांचे पंचनामे 

वसई विरारच्या भागात मागील काही दिवसांपुर्वी सुद्धा वादळीवाऱ्यासह पाऊस झाला होता. तेव्हा ही शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कृषीविभागाने केलेल्या पंचनाम्यात १५३.८८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. यात सुमारे ७७५ इतक्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले असून त्यांना शासनस्तरावरून मदत दिली जाणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.