वसई:- विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परीसरात रविवारी ‘वचनपूर्ती जल उत्सव’ कार्यक्रमादरम्यान रस्ते अडविल्याच्या कारणावरून गोंधळ निर्माण झाला होता. रस्ता अडवून कार्यक्रम घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. या गोंधळामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसर आहे. या भागात मागील काही वर्षांपासून पाण्याची मोठी समस्या होती. पालिकेला अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यानंतर आता या भागाला ही पाणी मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी ग्लोबल सिटी परिसरात वचनपूर्ती जलउत्सव कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला भाजपाचे आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे-पंडित, आमदार राजेंद्र गावित यांनी हजेरी लावली होती.

रस्त्यावरच हा कार्यक्रम ठेवण्यात आल्याने काही काळ रस्ते बंद होते. या रस्ते अडवणूकीच्या मुद्द्यावरून नागरिक आणि आयोजक यांच्या वाद निर्माण झाला होता. त्यातच एका महिला युट्युबर पत्रकाराला कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की झाल्याने वाद आणखीनच चिघळला आहे. एकाने जय श्रीरामच्या घोषणा देत अश्लील वर्तन करत धक्काबुकी केली, असा गंभीर आरोप करण्यात आला. त्या युट्यूबर तरुणीच्या तक्रारीवरून बोळींज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तणावपूर्ण वातावरण

 या प्रकरणामुळे रात्री दोन वाजेपर्यंत पोलीस ठाण्याबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.घटनेनंतर बविआचे माजी आमदार क्षितिज ठाकूर, शिवसेना ठाकरे गटाचे जनार्दन पाटील व  त्यांचे कार्यकर्ते

मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात पोहोचले होते. ज्यामुळे काहीकाळ तणाव वाढला होता. कार्यक्रमात झालेल्या या प्रकारामुळे विरारमध्ये भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. तर महिला पत्रकारासोबत घडलेल्या अपमानास्पद घटनेमुळे सामाजिक माध्यमांवर संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी महिलांवरील अशा वर्तनाविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.