विरार : रस्त्यांचे खोदकाम, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य मार्ग नसणे आणि रस्त्याचा निकृष्ट दर्जा यामुळे अर्नाळा-वसई रस्त्याची दूरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता संतप्त नागरिक करत आहेत.

विरार आणि वसई यांच्या पश्चिम बाजूंना जोडणारा अर्नाळा-वसई हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याचा वापर मोठ्याप्रमाणावर नागरिक करत असतात मात्र असे असले तरीही या रस्त्याची वेळोवेळी डागडुजी केली जात नसल्याने रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील नाळे, वाघोली, निर्मळ आणि भुईगाव परिसरात सर्वाधिक खड्डे असून यामुळे आता अनेक अपघाताच्या घटना समोर येत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने खड्डे लक्षात येत नाहीत. तसेच रात्रीच्या वेळी अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने अंधारात रस्त्यावरील खड्डे दिसत नाही. प्रशासन मोठ्या अपघातांची वाट पाहते आहे का ? आम्ही कितीकाळ अशा रस्त्यांवरून जीवघेणा प्रवास करायचा असा संतप्त सवाल गिरीज येथील नागरिक रीना डाबरे यांनी व्यक्त केला आहे.

या रस्त्यावर सध्या ठीकठिकाणी पालिकेकडून पाणीपुरवठा योजनेची कामे सुरु आहेत. यासाठी अनेक ठिकाणी रस्ता खोदून जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. मात्र त्यावर भरणी करून डांबरीकरण केल्यानंतर खणलेली बाजू पावसाच्या पाण्याने दबली जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे काही ठिकाणी रस्ता उंच सखल होऊन खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळेही अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. मंगळवारी निर्मळ येथे पाच वर्षाची शाळकरी मुलगी आणि तिचे वडील खड्ड्यात पडून जखमी झाले होते त्यांनतर स्थानिक नागरिकांचा प्रशासनाविरोधात रोष वाढला आहे. निर्मळ परिसरात चार ते पाच शाळा असून हजारो विद्यार्थी या रस्त्याने दररोज प्रवास करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना करून हा प्रश्न सोडविण्याची मागणी निर्मळ येथील नागरिक किरण गोम्स यांनी केली आहे.

जलवाहिनी टाकताना महापालिकेने खोदकाम केले होते मात्र त्यानंतर त्याची योग्यरीत्या दुरुस्ती न केल्याने रस्त्यांची अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते समीर वर्तक यांनी सांगितले आहे. पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे. तसेच पालिकेच्या अखत्यारीत जे रस्ते येत आहेत त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहेत असे सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी निर्मळ येथील जगद्गुरु शंकराचार्य समाधी मंदिराच्या इथे असलेल्या खड्ड्यात दुचाकी पडून वडील आणि त्यांची पाच वर्षांची मुलगी जखमी झाले. ते आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात होते. सुदैवाने त्यांना फार मार लागला नाही. या घटनेनंतर निर्मळ परिसरातील शाळा आक्रमक झाल्या असून विद्यार्थ्यांसह आंदोलनाचा इशारा शाळांनी दिला आहे.