वसई : अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी तातडीने आर्थिक मदत मिळावी, तसेच गतवर्षीच्या आपतग्रस्तांना प्रलंबित मदत त्वरित द्यावी या मागणीसाठी शुक्रवारी काँग्रेस पक्षाकडून काळी दिवाळी आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी सरकारला झुणका भाकरीची शिदोरी दिली.
गेल्या काही वर्षांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन, तसेच पालघरला बोलावून मदतीचे केवळ पोकळ आश्वासन देत सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे,असा आरोप काँग्रेस वसई विरार जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी केला. शासनाच्या याच अनास्थेचा आणि निषेध म्हणून आज ‘काळी दिवाळी’ साजरी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाच्या शेवटी काँग्रेस नेत्यांनी प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांबाबतचे निवेदन सदर केले. प्रांताधिकाऱ्यांमार्फत सरकारला झुणका भाकरीची शिदोरीही देण्यात आली. या आंदोलनात काँग्रेस वसई विरार जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांच्यासह कॅप्टन निलेश पेंढारी, प्रविणा चौधरी, किरण शिंदे, मिल्टन सौद्या, कुलदीप वर्तक आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले होते.
दोन वर्षांपासून अनुदानाची प्रतीक्षा
यंदा शहरात पडलेला पावसामुळे शेतीचे नुकसान तर झालेच आहे. पण दोन वर्षांपूर्वी आलेल्या वादळात शेतीचे तसेच गोठ्याचे मोठ्या नुकसान झाले होते. याबाबत तहसील कार्यालय, महानगरपालिका यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप अनुदान मिळाले नसल्याची प्रतिक्रिया नेपोलियन डायस या शेतकऱ्याने दिली.
