वसई: वसईतील दांपत्याचा फिलीपाईन्स देशात झालेल्या रस्ते अपघातातमृत्यू झाला आहे. जेराल्ड पेरेरा (५०) आणि प्रिया परेरा (४६) अशी या दांपत्याची नावे आहेत. त्यांच्या या निधनामुळे ते रहात असलेल्या सांडोर गावात शोककळा पसरली आहे.
जेरॉल्ड आणि प्रिया हे दोघेही वसई पश्चिमेच्या सांडोर गावात रहात होते. मे महिन्याची सुट्टी लागल्याने ते फिलीपिन्समधील सेबू येथे सहलीसाठी गेले होते. तेथे फिरण्यासाठी त्यांनी दुचाकी भाड्याने घेतली होती. शनिवारी सकाळी बाडीयान येथे जेराल्ड आणि प्रिया दुचाकीवरून जात असताना एका फिलिपिनो येथील ट्रक चालकाने ओव्हर टेक करताना दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे त्यांची दुचाकी सिमेंटच्या विद्युत खांबाला धडकली. या अपघातात प्रिया परेरा हीचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या जेराल्ड परेरा यांना मांडौ शहरातील चोंग हुआ रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान रविवारी त्यांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी बाडियान पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद केली असून धडक देणाऱ्या वाहनचालकाला अटक करण्यात आली. या घडलेल्या घटनेमुळे वसईच्या विविध भागातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
जखमी असूनही धर्मगुरूंना फोन केल्याने अपघाताबाबत समजले
जेराल्ड आणि प्रिया परेरा हे सांडोर गावात रहात होते. त्यांना तनिश (२०) आणि त्रिशा (१७) अशी दोन मुले आहे. सुट्टीसाठी दोघेच फिलिपाईन्स मध्ये गेले होते. अपघातात जखमी झाल्यावर जेरॉल्ड यांनी वसईच्या माणिकपूर चर्च मधील धर्मगुरू फादर रेमंड रुमाव यांना फोन केला आणि अपघाताची माहिती दिली. त्यामुळे त्यांच्या अपघाताचे वृत्त कुटुंबिय आणि इतर नातेवाईकांपर्यंत पोहोचवू शकलो. अन्यथा त्यांना ही माहिती कळायला खूप उशीर झाला असता असे फादर रुमाव यांनी सांगितले. त्यांचे मृतदेह वसईत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परेरा यांचे नातेवाईक फिलिपाईन्स येथे गेले आहेत.