वसई : शहरात सर्वत्र मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली असताना वसईतून मात्र हुल्लडबाजांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दोन तरुण महापालिकेच्या कचऱ्याच्या डब्यात फटाके फोडत असल्याचे दिसत आहे. तर सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्या तरुणांच्या कृतीबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त केला आहे.

दिवाळीच्या अगदी पहिल्याच दिवसापासून वसई विरार शहरात सुतळीबॉम्ब, लवंगी, रॉकेट असे विविध प्रकारचे आणि मोठ्या आवाजाचे फटाके फोडून आतषबाजी केली जात आहे. अशातच वसई पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरातून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दोन तरुण फटाके फोडताना दिसत आहेत. तर त्यातलाच एक तरुण रस्त्याच्याशेजारी असणाऱ्या महापालिकेच्या कचऱ्याच्या डब्यात पेटता सुतळीबॉम्ब टाकून फोडला जात आहे. बॉम्बच्या तिव्रते कचऱ्याच्या डब्याचे झाकण फुटून गेले आहे.

तरुणांनी केलेल्या या प्रकारचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. दिवाळीच्या नावाने हुल्लबाजी करणाऱ्यांना पायबंद घालावा. तसेच रेल्वे स्थानक परिसर आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. आधीच शहरात पालिकेच्या कचरा कुंड्यांची दयनीय अवस्था आहे त्यातच अशा प्रकारे साहित्याची नासधूस करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.