वसई: वीज मीटर पुन्हा जोडणी करून देण्यासाठी चाळीस हजारांची लाच मागितल्या प्रकरणी महावितरणच्या नालासोपारा येथील वायमनला पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. राजेश रामप्रसाद सरोज (४५) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या घरातील वीज देयक थकीत असल्याने तेथे कार्यरत असलेले वायरमन राजेश सरोज यांनी वीज जोडणी खंडित केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी थकीत वीजदेयक भरणा करून पुन्हा वीज जोडणी करण्यासाठी सरोज यांना सांगितले होते. सरोज यांनी वीज जोडणीसाठी ६० हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु तडजोडी नंतर ४० हजार रुपये लाच मागितली. याप्रकरणी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून चाळीस हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या कर्मचाऱ्याला गुरुवारी दुपारी दीड सुमारास रंगेहात पकडले आहे. राजेश रामप्रसाद सरोज (४५) असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दादाराम कारंडे, पोलीस हवालदार नवनाथ भगत, पोलीस अंमलदार आकाश लोहोरे, जितेंद्र गवळे त्यांच्या पथकाने केली आहे. भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास किंवा लाच मागण्याऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.