वसई : वसई विरार शहरात नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरा पर्यँत बार चालविले जातात. शनिवारी रात्रीच्या सुमारास विंग्स ऑन फायर या बारवर वसईच्या आमदारांनी छापा टाकून धांगडधिंगाण्याचा प्रकार उघड केला आहे. उशिरापर्यँत बार सुरू असतानाही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात बार अँड रेस्टॉरंट आहेत. यातील काही बार हे नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरा पर्यँत सुरू ठेवले जातात. अशा बार मध्ये मोठ्या प्रमाणात धांगडधिंगाना सुरूच असतो. तर काही वेळा बारच्या बाहेर सुद्धा मद्याच्या नशेत तरुणाई कडून गैरकृत्याचे प्रकार घडतात. तसेच अनेकदा मद्याच्या नशेत अपघातासारख्या घटना ही घडतात.

शनिवारी रात्री वसई पश्चिमेच्या दत्तानी मॉल मध्ये असलेल्या विंग्स ऑन फायर या बार वर खुद्द वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी छापा टाकला. त्यावेळी रात्रीच्या अडीचच्या सुमारास ही बार चालू ठेवून त्या ठिकाणी धांगडधिंगाना सुरू असल्याचे निदर्शनास आले. इतक्या रात्री उशिरापर्यंत बार सुरू असल्याने त्यांची या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. अशा कृतीमुळे त्याचा मोठा परिणाम हा तरुणाईवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी अशा बार वर कारवाई करण्याऐवजी त्याला संरक्षण देण्याचे काम करीत असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. आमदारांनी अचानकपणे टाकलेल्या धाडीमुळे बार चालकांचे धाबे दणाणले आहेत.

बार उशिरापर्यंत चालू असल्याने अनेक गैरप्रकार घडतात त्यांच्या तक्रारी ही आमच्या पर्यंत येत असतात. अशा प्रकाराला आळा बसावा यासाठी पोलीस आयुक्त यांच्याकडे सुध्दा तक्रार केली जाणार आहे. – स्नेहा दुबे- पंडित, आमदार वसई.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

वसई विरार शहरात रात्री उशिरापर्यंत बार सुरू असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. विशेषतः रात्री १ वाजेपर्यंत बार बंद होणे गरजेचे असताना ते रात्री उशिरा पर्यंत चालविले जातात. मग अशा बार वर पोलीस कारवाई करण्याऐवजी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ही आता करण्यात येत आहे.