वसई: मुंबई गुजरात यासह अन्य भागांना जोडणाऱ्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहने उभी करण्यासाठी प्राधिकरणाकडून ट्रक टर्मिनलची सुविधा उपलब्ध न करून दिल्याने अवजड वाहने ही मुख्य रस्त्यावरच उभी केली जात आहेत त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो याशिवाय अपघातांसारखे प्रकार ही घडतात
मुंबई, ठाणे, पालघर, वसई विरार, मिरा भाईंदर यासह अन्य भागांना जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मागील काही वर्षांत या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. दररोज पालघर वसई या भागातून दररोज साधारपणे २० ते २५ हजार इतकी वाहने प्रवास करतात. त्यात विशेषतः मालवाहतूक करणारी जवळपास ७० टक्के वाहने आहेत.
काही मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना माल गाडीत भरणे- उतरविणे, महामार्गावरून अवजड वाहने चालविण्याची वेळ मर्यादा, विश्रांती साठी थांबावे लागते.परंतु ही वाहने उभी करण्यासाठी ट्रक टर्मिनल किंवा नियोजित अशी जागा नसल्याने ही वाहने उभी करण्यास मालवाहतूकदारांना अडचणी येतात. अशा वेळी मालवाहतूकदार ही अवजड वाहने महामार्गाच्या मुख्य वाहिनीवरच उभी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने याचा परिणाम हा महामार्गावरील वाहतुकीवर होत असतो. काही वाहने तर अगदी थेट मुख्य रस्त्याच्या वाहिनीवर उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असते.
अनेकदा मुख्य रस्त्याच्या भागात ही वाहने उभी असल्याने काही वेळा रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांच्या धडका लागून अपघाता सारख्या घटना घडतात. यासाठी ट्रक टर्मिनल असणे गरजेचे असल्याचे मालवाहतूक दार सांगत आहेत. यापूर्वी ट्रक टर्मिनल साठी नियोजन करण्याचे ठरले होते मात्र जागेअभावी ते काम मार्गी लागले नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ट्रक टर्मिनल तयार करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जर जागा उपलब्ध झाली तर ते काम आम्ही पूर्ण करून देऊ. – सुहास चिटणीस, प्रकल्प निर्देशक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
ट्रक टर्मिनल नसल्याने वाहने मुख्य रस्त्यावर उभी राहत आहेत. परंतु जागाच नसल्याने वाहने टर्मिनल तयार करण्यास अडचणी येत आहे. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे हा विषय मांडला आहे. आम्हाला जागा उपलब्ध झाल्यास आम्ही त्याचे नियोजन करून शकू असे महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.
गावपाड्यातील नागरिकांना त्रास
महामार्गाच्या लगतच अनेक गावपाड़े आहेत त्यांची सुद्धा याच मार्गावरून ये जा सुरू असते. मात्र ही वाहने अगदी रस्त्याच्या मध्येच उभी असल्याने नागरिकांना अडचणी येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुनील मिश्रा यांनी सांगितले आहे. दुसरीकडे सेवा रस्ते ही अपुरे आहेत तेथेही वाहने उभी करण्यास जागा नसते तर काही सेवा रस्त्यावर आधीच काही वाहतूक दारांनी अतिक्रमण करून जागा अडवून ठेवली आहे असे नागरिकांनी सांगितले आहे.