वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग व कामण- चिंचोटी -भिवंडी रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या समस्येला त्रस्त झालेले विद्यार्थी व स्थानिक भूमीपुत्रांनी बुधवारी सायंकाळी चिंचोटी येथे रास्ता रोको आंदोलन करीत संताप व्यक्त केला.

वसई पूर्वेच्या भागातून कामण, चिंचोटी, पोमण, नागले, मालजीपाडा, ससूनवघर, ससूपाडा यासह अन्य गाव पाड्यात राहणारे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी वसई विरार, नायगाव, जूचंद्र अशा ठिकाणी शाळेत व महाविद्यालयात जातात. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग व कामण चिंचोटी असे त्यांना ये जा करण्याचे दोन एकमेव मार्ग आहेत. या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी समस्या निर्माण होऊ लागली आहे. आता परीक्षाही तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखीनच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – भाईंदर मेट्रोला विलंब होणार ? काशिगाव स्थानाकाच्या जागेअभावी प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता

बुधवारी सायंकाळी चिंचोटी येथे भूमिपूत्र संघटना व संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. महामार्गाचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तर चिंचोटी- कामण भिवंडी रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांनी महामार्गाचा पायी चालत जात पाहणी दौरा केला होता. त्यानंतर समस्या सोडवण्यात येतील असे सांगण्यात आले होते. मात्र आजही यावर कोणताच तोडगा काढला नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. महामार्गावर आरएमसीची विरुद्ध दिशेने जाणारी वाहने यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळेच वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप भूमिपूत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी सांगितले आहे. तर वाहतूक कोंडी असल्याने तीन ते चार तास आमच्या शाळेची बस अडकून पडते, अशा वेळी जर मुलांना लघु शंका व अन्य समस्या निर्माण झाल्यास आम्ही कुठे जायचे असा प्रश्न शालेय विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे. तसेच जोपर्यंत वाहतूक व्यवस्था व रस्त्याची कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल बंद करण्यात यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. या आंदोलनामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. या आंदोलनात शाळकरी विद्यार्थी यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

हेही वाचा – मुलीची छेड काढणाऱ्याला रंगेहाथ पकडले, आईने घराबाहेर सीसीटीव्ही लावून रचला सापळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयात धाव घेणार

महामार्ग व अन्य समस्यांबाबत वेळोवेळी महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम, महापालिका, पोलीस प्रशासन यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून सोडविण्यासाठी मागणी केली आहे. मात्र त्याकडे अधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत असल्याने आता कोणत्याच उपाययोजना होत नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना होतो. आता त्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय पाटील यांनी सांगितले आहे.