वसई:- वसईच्या भागातून लांब पल्याच्या ठिकाणी प्रवासाठी वसई रेल्वे स्थानकात टर्मिनस तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अजूनही प्रस्ताव कागदावर मंजूर असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने हे काम पूर्ण होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
वसई रोड रेल्वे स्थानकात टर्मिनस बनवावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवासी करत आहेत. २०१८ मध्ये तत्कालीन केंंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी पुन्हा रेल्वे टर्मिनसची घोषणा करून २०२३ पर्यंत टर्मिनस पूर्ण केले जाणार असल्याचेही जाहीर केले होते. याबाबत पश्चिम रेल्वेने दोन टप्प्यात रेल्वे टर्मिनस तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. पहिल्या टप्प्यात किमान बांधकामांचा वापर करून काही भागाचा विकास आणि दुसर्या टप्प्यात पुर्ण टर्मिनस विकसित केले जाणार होेते. यासाठी ३०० हेक्टर जागा हस्तांतरीत करावी लागणार होती. मात्र विविध अडचणींमुळे ते काम झाले नव्हते.
त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पुन्हा या प्रश्नाचा पाठपुरावा केंद्रात केला होता. यावर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यावर मागणी मान्य झाल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर ही कामाला गती मिळाली नाही. पश्चिम रेल्वेने टर्मिनस चे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्यक्षात कामालाच सुरवात झाली नसल्याने हे काम कधी पूर्ण होईल असा प्रश्न वसईतील नागरिकांनी केला आहे. याबाबत सातत्याने आम्ही पाठपुरावा करीत आहोत असे सामाजिक कार्यकर्ते जॉय फरगोस यांनी सांगितले आहे.
वसई विरारचे नागरीकरण वाढत आहे. याशिवाय बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे त्यासाठी हे टर्मिनस अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रशासन कागदीघोडे नाचवत असल्याने पुन्हा एकदा रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे. या कामाला गती न दिल्यास प्रवाशांच्या मार्फत आंदोलन केले जाईल असा इशारा फरगोस यांनी दिला आहे.
टर्मिनलच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न
वसईतून मोठ्या संख्येने प्रवासी बाहेरगावी प्रवास करत असतात. परंतु येथील नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी वांद्रे, कुर्ला, दादर आणि सीएसटी रेल्वे स्थानकात जावे लागते. यासाठी वसई रेल्वे स्थानकात टर्मिनल तयार करण्यात येत आहे. या कामाला गती मिळून हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून पुन्हा एकदा हा मुद्दा अधिवेशनात मांडून रेल्वे मंत्र्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले आहे.
२०२७ पर्यँत पूर्ण करण्याचा दावा
प्रवाशांची रेल्वे विभागाला विचारण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना निविदा प्रक्रिया तयार करण्याचे काम मंजूर आराखड्यानुसार सुरु आहे. यात कोणत्याही जमीन अधिग्रहणाचा समावेश नाही. २०२७ पर्यंत हा प्रकल्प कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण होणे अपेक्षित आहे. यात टेलिकॉम, विद्युत सिग्नल आणि इतर विभागांचा समावेश आहे. याबाबत अजून कोणतीही निविदा देण्यात आली नसल्याचे रेल्वेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.