विरार : मागील चार दिवसांपासून मुंबईसह पालघर जिल्ह्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. वसईत गेल्या २४ तासात २०४ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पावसाची नोंद वसई मंडळात झाली असून इथले पावसाचे प्रमाण २१९ मिमी इतके आहे. वसई विरारमध्ये सोमवारी सकाळपासून पडणाऱ्या पावसाचा जोर मध्यरात्री नंतर वाढला. आज सकाळपासूनच शहरात मुसळधार पाऊस कोसळत असून याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेसह इतर सेवांवर होताना दिसत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी देखील (१९ ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. वसई विरारमध्ये सलग पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पाकिकेकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मुख्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रासह सर्व प्रभाग समिती कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सुरु राहणार असून आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
शहरातील अनेक मुख्य रस्ते आणि सखल भाग पाण्याखाली गेल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. वसई विरारच्या पूर्व भागात देखील पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. भोयदापाडा, एव्हरशाईन रस्ता, गोखिवरे, कामण-भिवंडी रस्ता आणि सातिवली रस्ता येथील भाग पाण्याखाली गेले आहेत. पुढील २४ तासात मुसळधार पावसासह ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. यामुळे वसई विरारच्या किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी
सोमवारी हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यांनतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आज मंगळवारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
वसई तालुक्यातील पावसाची नोंद
आगाशी – १६५ मिमी
निर्मळ – २०० मिमी
माणिकपूर – २१५ मिमी
वसई – २१९ मिमी
कामण – २१८ मिमी
बोळींज – १९९ मिमी
मांडवी – २१३ मिमी
पेल्हार – १३ मिमी