वसई: – महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्राअभावी अनेक समस्यांचा तोंड द्यावे लागते. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत वसई तहसील कार्यालयाकडून शाळा तिथे दाखला हे अभियान राबविले जात आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होते. पण, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र अशा महत्त्वाच्या कागदपत्रांअभावी विद्यार्थ्यांना समस्यांना तोंड द्यावे. काहींना इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही तर काहींचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. विद्यार्थ्यांना दाखले वेळेत मिळावे यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या वसई सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्ग वसई तहसील कार्यालयाकडून विविध खाजगी आणि जिल्हापरिषद शाळांमध्ये शाळा तिथे दाखला हे अभियान राबविले जात आहे.

या अभियानांतर्गत वसई तालुक्यातील शंभरहून अधिक शाळांमध्ये महा- ई-सेवा केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिबिरात सहभागी झालेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची कागदपत्र गोळा करून महा- ई-सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन पद्धतीने दाखल्यांसाठी अर्ज केला जाणार आहे. ज्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेण्याआधीच विद्यार्थ्यांकडे कागदपत्र उपलब्ध असतील.

महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियांना फार कमी अवधी उरला असताना विद्यार्थ्यांकडून दाखल्यांसाठी अर्ज केले जातात. अशावेळी कागदपत्रांअभावी तसेच वेळेच्या मर्यादेमुळे अनेक विद्यार्थ्यांना दाखला प्राप्त होण्यास विलंब होतो. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शाळा तिथे दाखला हे अभियान राबविले जात आहे. – शशिकांत नाचण, नायब तहसीलदार (महसूल)