वसई – पक्षाचे नेते राजीव पाटील यांच्यावर कुठलाच अन्याय झाला नाही. त्यांना चांगली संधी मिळाल्याने ते पक्ष सोडून जात आहेत, असा दावा बहुजन विकास आघाडीने मंगळवारी केला. राजीव पाटील उर्फ नाना यांच्या बंडखोरीनंतर ठाकूर कुटुंबीय तसेच बहुजन विकास आघाडीत फूट पडल्याने वसई विरारमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या बंडाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रथमच विरारमध्ये बैठक घेतली. राजीव पाटील जरी निवडणुकीत समोर असले तरी ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरून जिंकण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

वसई विरारच्या राजकारणावर मागील ३५ वर्षांपासून हितेंद्र ठाकूर यांचे एकहाती वर्चस्व आहे. राजीव पाटील हे ठाकूरांचे आत्येबंधू असून पक्षाचे २ क्रमांकाचे नेते आहेत. ते पक्षाचे कार्याध्यक्ष होते आणि त्यांनी पक्ष रुजवला होता. मात्र अचानक राजीव पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने बविआला मोठा धक्का बसला आहे. राजीव पाटील यांना भाजपाच्या तिकिटावर नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. राजीव पाटील पक्ष सोडून गेल्याने पक्षाची मोठी हानी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरारमध्ये बविआच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. राजीव पाटील यांनी पक्ष सोडणे हे दुर्देवी असल्याचे नेत्यांनी सांगितले. मात्र राजीव पाटील यांच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही. त्यांनी अद्याप अधिकृत राजीनामाही दिलेला नसल्याचे नारायण मानकर यांनी सांगितले. पक्षामध्ये स्थित्यंतरे होत असतात. परंतु पक्ष संपणार नाही उलट पालघर जिल्ह्यातील ६ मतदारसंघात आम्ही लढून जिंकून दाखवून असे माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी सांगितले. राज्यात अन्य मतदारसंघात देखील पदाधिकार्‍यांशी बोलून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. राजीव पाटील यांना चागली संधी मिळाल्याने ते जात आहेत. त्यांनी पक्ष फोडला नाही किंवा अन्याय म्हणून ते गेले नाहीत असे पक्षाचे प्रमुख नेते मुकेश सावे यांनी सांगितले.

हेही वाचा – वसई: राजीव पाटील यांचा भाजप मधील प्रवेश निश्चित

तुम्ही सोबत चला…

राजीव पाटील यांना थांबविण्याचा प्रयत्न केल नाही का? याबाबत पक्षाचे नेते उमेश नाईक यांच्याकडे विचारणा करण्यात आली. मी त्यांना का जात आहेत असं विचारताच ते मलाच सोबत येण्यास सांगितले, असे नाईक यांनी सांगितले. व्यक्तिगत मैत्री आणि पक्ष हे वेगळे असल्याने हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत राहणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

हेही वाचा – दसऱ्याच्या निमित्ताने वाहन खरेदी जोरात; परिवहन विभागात साडेतीन हजाराहून अधिक वाहनांची नोंदणी ; ११ कोटी ९४ लाखांचा महसूल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्गज नेते बैठकीत हजर

या बैठकीला हितेंद्र ठाकूर काही वेळ उपस्थित होते. याशिवाय आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, माजी महापौर नारायण मानकर, माजी महापौर रुपेश जाधव, माजी उपमहापौर उमेश नाईक आदी वरच्या फळीतील नेते हजर होते. राजीव पाटील यांचे संख्खे बंधू आणि पक्षाचे संघटक सचिव कौटुंबिक कारणामुळे हजर राहू शकले नाही.