वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पूल व ससूनवघर परीसरात पडलेले खड्डे यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर होत असून बुधवारी सकाळ पासूनच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. या कोंडी मुळे मालवाहतूकदार व अन्य प्रवासी यांचे चांगलेच हाल झाले असून दोन ते तीन तास कोंडीचा सामना करावा लागला.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. पावसाळा सुरू होताच या महामार्गावर विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग ही फारच मंदावला आहे. बुधवारी सकाळी दहा वाजल्या पासूनच मुंबई- ठाणे दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

वर्सोवा पूल, ससूनवघर, ससूपाडा, मालजीपाड्या पासून नायगाव पर्यंत वाहनांच्या सात ते आठ किलोमीटर पर्यँत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना दोन ते तीन तास या कोंडीत अडकून राहावे लागले. त्यामुळे ठाणे व मुंबई च्या दिशेने कामावर निघालेल्या नागरिकांचे चांगलेच हाल झाले. महामार्गावर खड्डे प्रचंड आहेत. त्यामुळे वाहनांची गती कमी होते त्यामुळे वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात होत आहे असे वाहनचालकांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गायमुख जवळ एक अपघात घडला होता. याशिवाय प्रीतम ढाबा ते वर्सोवा पूल दरम्यान खड्डे जास्त आहेत त्यामुळे कोंडी झाली असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. त्यातच काही जण विरुद्ध दिशेने वाहने काढण्याचा प्रयत्न केल्याने कोंडीत भर पडत आहे. वाहतूक नियंत्रण करण्याचे काम केले जात आहे असे महामार्ग वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.