वसई : सोमवारपासून सर्वत्र शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रीनिमित्ताने वसई विरार व मीरा भाईंदर शहरात उत्साहाचे वातावरण असून यावेळी शहरात सार्वजनिक आणि घरगुती अशा ९ हजार ३९७ ठिकाणी घटस्थापना केली जाणार आहे.

गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्री उत्सव ही मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. वसई विरार मध्ये विरार येथील जीवदानी देवी मंदिर, अर्नाळा येथील कालिका देवी मंदिर, मारंबळ पाडा येथील सोनूबाई भवानी मंदिर,जूचंद्र येथील चंडिका देवी मंदिर व मीरा भाईंदर येथील धारावी देवी मंदिर अशा प्रसिद्ध मंदिरांसह अन्य विविध ठिकाणच्या भागातही मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव पार पडणार आहे. याशिवाय विविध ठिकाणच्या गृहसंकुलात व गाव पाड्यात नवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे.

या उत्सवाच्या निमित्ताने वसई व भाईंदर शहरात ९ हजार ३९७ घरगुती व सार्वजनिक ठिकाणी घटस्थापना केली जाणार आहे.यात २ हजार ६५६ ठिकाणी देवींच्या मूर्ती, तर ८५८ ठिकाणी देवींच्या प्रतिमा व तर ५ हजार ८८३ ठिकाणी घट स्थापित करून नवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे. वसई विरार व मीरा भाईंदर शहरातील विविध ठिकाणी असलेल्या प्रसिद्ध देवींच्या मंदिरात, सार्वजनिक मंडळाच्या मंडपात नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने विद्युत रोषणाई, सजावट, नऊ दिवसांचे नियोजन यासह इतर कामांची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर यंदा शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या गरब्यांची संख्या १ हजार २१३ इतकी असणार आहे.

रंगीबेरंगी पोषाखांना मागणी

यंदा नवरात्रीमध्ये पारंपरिक पोशाखांना मोठी मागणी आहे. रंगीबेरंगी चनिया चोली, धोती-कुर्ता, केडिया, आणि घागरा-चोली यांसारखे पारंपरिक कपडे बाजारात दाखल झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या पारंपरिक कपड्यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे विक्रेत्याचे म्हणणे आहे. चनिया चोली सेट १ हजार ५०० ते ३ हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे. तर पुरुषांसाठी बाजारात आलेले जॅकेट, केडिया, धोती-कुर्ता १ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरात उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी देखील वेगवेगळ्या वयोमानानुसार पारंपरिक पोशाख बाजारात विक्रीस ठेवण्यात आले आहेत.

पोलिसांकडून सूचना

शहरात प्रसिद्ध देवस्थाने असल्याने विविध भागातून भाविक दर्शनासाठी येतात तर दुसरीकडे विविध ठिकाणी भव्य गरबा नृत्याचे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. मात्र उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या जात आहेत. उत्सव साजरा करताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घेणे तसेच इतर सूचना पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा ही पोलिसांनी दिला आहे.