वसई: विरार पश्चिमेच्या अर्नाळा येथे एसटी व रिक्षांची धडक लागून भीषण अपघात घडला आहे. रविवारी ९ च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रिक्षा चालक महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत. कल्पना कोलगे (५५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

विरार ते अर्नाळा असा मुख्य रस्ता गेला आहे. याच रस्त्यावरून अर्नाळा आगारातून रविवारी सकाळी ९ च्या सुमारास एम एच ४० एन ९७०६ या क्रमांकाची बस शिर्डी साठी रवाना झाली होती. तर एम एच ४८ बी एफ ६८६१ ही रिक्षा विरारहून अर्नाळ्याकडे येत होती. याच दरम्यान अर्नाळा सोसायटी जवळच्या भागात एसटी चालक ओव्हरटेक करताना एसटी व रिक्षाची जोरदार धडक झाली.

या धडकेत रिक्षाचालक महिलेसह तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. तर एका प्रवासी महिलेच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्पना कोलगे (५५) असे मृत महिलेचे नाव असून ती अर्नाळा जुना कोळीवाडा या भागातील रहिवासी आहे. रिक्षा चालक पूनम वरठे व अन्य दोन प्रवासी यात जखमी झाले असून स्थानिकांनी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. घटनेनंतर एसटी चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याशिवाय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अर्नाळा पोलिसांनी दिली आहे.