वसई :- वसई-विरार शहरात शुक्रवारी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि विविध सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण करून आणि देशभक्तीपर गीते गाऊन नागरिकांनी स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा केला. यावेळी वसई विरार पालिकेकडून वृक्ष दिंडी काढत वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती आणि निसर्ग संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले. अनेक शासकीय इमारती, पोलीस ठाण्यांचे परिसर आणि शहरातील महत्त्वाचे चौक तिरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. बाजारपेठांमध्येही तिरंगी ध्व्ज, तिरंगी बॅचेस, पताका आणि इतर सजावटीच्या सामानाची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

स्वातंत्र्य दिनाच्या सकाळीच शहरातील प्रत्येक भागातून देशभक्तीपर गीतांचे सूर ऐकू येत होते. वसई-विरार महानगरपालिका मुख्यालय, तहसील कार्यालय, न्यायालय आणि मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ध्वजारोहण सोहळे पार पडले. या सोहळ्यांमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याचबरोबर, शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्येही स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील उद्याने, रस्ते आणि स्मारकेही तिरंग्याच्या रंगात सजवण्यात आली होती. काही मंदिरांमध्येही खास सजावट करून देशभक्तीचा जागर करण्यात आला. यावर्षीचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा केवळ औपचारिक न राहता, सामाजिक संदेश देणाराही ठरला. स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आणि वृक्षदिंडीचेही आयोजन करण्यात आले होते. भुईगाव येथील स्वामी समर्थ मठातही रक्तनदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पालिकेकडून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प

वसई विरार शहर महानगरपालिकेत स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला. यावेळी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते वुक्षरोपण करण्यात आले. तसेच पालिकेकडून यावेळी वृक्षदिंडी काढण्यात आली होती. यात आमदार राजन नाईक, पालिकेचे आयुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिकारी आणि कर्मचारी आदी सहभागी झाले होते. तसेच शालेय विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी विविध संदेश दिले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी भारतमाता, वारकरी, देवता आणि राष्ट्रपुरुष आदी विविध वेशभूषा साकारत स्वातंत्र्य दिनासाठी संदेश दिले.

विरारच्या विवा महाविद्यालयात किल्ले प्रदर्शन

विरार पश्चिमेच्या नवीन विवा महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘शिवकालीन दुर्गसंस्कार’ या किल्ले प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून निवड केलेल्या बारा किल्ल्यांची प्रतिकृती विद्यार्थ्यांकडून साकारण्यात आली आहे. नुकताच युनेस्कोने राज्यातील बारा किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले आहेत. या किल्ल्यांचे महत्व आणि माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी अतिशय कमी साहित्यात आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करत तीन ते चार दिवसांत हे किल्ले साकारले आहेत. किल्ल्यांची माहिती कळावी यासाठी प्रत्येक किल्ल्याच्या शेजारी क्यूआर कोड ठेवण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक खेळ आणि वादनाचे सादरीकरण केले.