विरार : वसई विरारमध्ये गणेशोत्सव काळात करण्यात येणाऱ्या चलचित्र देखाव्यांची परंपरा कायम असून यावेळी अनेक गावांमध्ये विविध सामाजिक विषय घेऊन चलचित्र साकारण्यात आली आहेत. विरार पश्चिमेच्या आगाशी, टेंभीपाडा, बोळींज तसेच वसईच्या जूचंद्र, उमेळे, उमेळमान, वसई गाव यासह अनेक गावांमध्ये गेल्या ४० हून अधिक वर्षे ही परंपरा सुरु आहे.
वसई विरारमध्ये गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. यासाठी सार्वजनिक आणि घरगुती गणपतींसाठी देखावे आणि सजावट केली जाते. वसईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासोबतच चलचित्र देखाव्यांचेही आकर्षण असते. त्यासाठी एखादा सामाजिक, धार्मिक संदेश देणारा विषय निवडून त्यावर चलचित्र साकारले जाते. ही चलचित्र घरगुती गणेशोत्सवात मोठ्या संख्येने साकारली जातात. यासाठी घरातील सदस्य दोन महिन्याआधीपासून तयारीला लागतात.

यंदाही अनेक ठिकाणी ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘संभाजी महाराज’, ‘त्रिभाषा वाद’ , नृसिंह अवतार’, अशा विषयांवर चलचित्रे साकारली आहेत. हे चलचित्र देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहे. जूचंद्र गावात चलचित्र देखाव्यांची मोठी परंपरा आहे. इथल्या राकेश भोईर व दिनेश भोईर यांनी यावेळी बोगस डॉक्टरांकडून रुग्णांची होणारी फसवणूक हा विषय घेऊन ‘डॉक्टर देव की राक्षस?’ हा देखावा साकारला आहे.

तर जयेश भोईर यांनी मराठी भाषा व अस्मिता टिकावी यावर प्रबोधन करणारा देखावा साकारला आहे. नालासोपाऱ्याच्या नाळे गावात राहणाऱ्या मनिष म्हात्रे व प्रशांत म्हात्रे यांच्या घरी यंदा अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनाचा सुंदर असा चलचित्र देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भावीकांची गर्दी होत आहे.अनंत चतुर्दशी पर्यंत हा देखावा पाहता येणार आहे.

आगाशीच्या टेंभीपाडा येथे राहणारे भगवान वैती यांच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून चलचित्र देखावा साकारला जातो. यंदा त्यांच्या घरी ‘ऑपरेशन सिंदूर’ यावर देखावा साकारण्यात आला आहे. यात रणगाडे, विमाने यांच्या प्रतिकृती करण्यात आल्या आहेत. नायगावच्या उमेळे गावातही अनेक ठिकाणी चलचित्रे साकारली जातात. दरवर्षी आम्ही विविध विषय घेऊन चलचित्र साकारतो त्यामुळे गावात असणारी चलचित्रांची परंपरा जपली जाते असे येथील रहिवासी आतिश पाटील यांनी सांगितले.

मागील ४३ वर्षांपासून आमच्या कुटुंबा तर्फे चलचित्र देखावा उभारला जात आहे. विशेषतः ज्वलंत विषय निवडून त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहोत. – जयेश भोईर, चलचित्रकार जूचंद्र वसई.
चलचित्र पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
चलचित्राच्या निमित्ताने गावागावात गणेशोत्सवांच्या परंपरांचे दर्शन होत आहे. चलचित्र पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत यामुळे गावागावात मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. यात इतर राज्यातून स्थलांतरीत झालेल्या नागरिकांचाही समावेश आहे. यानिमित्ताने त्यांना वसईतील परंपरा तसेच मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन होत आहे. मी गेले दोन वर्षे आगाशी गावात चलचित्र पाहायला येते. गावातील रहिवासी यासाठी खूप मेहेनत घेतात. चलचित्राच्या माध्यमातून एखादा सामाजिक विषय अधिक प्रभावीपणे पोहोचतो असे रितिका बॅनर्जी यांनी सांगितले.