वसई:- वसई विरार शहरात आता अमली पदार्थांच्या तस्करी सोबतच अमली पदार्थ तयार करणारे कारखाने ही उभे राहू लागले आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्गालगतच्या भागात असे कारखाने छुप्या मार्गाने चालविले जात आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हा प्रकार उघडकीस आला असून नेमके हे अमली पदार्थ निर्मिती करणारे कारखाने आहेत तरी कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वसई विरार शहरात अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वसई, नालासोपारा , भाईंदर या भागातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळून येत आहेत. विशेषतः शहरात फोफावत असलेल्या अनधिकृत गाळ्यात व शेड मध्ये छुप्या मार्गाने कारखाने चालविले जात आहेत.

नुकताच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या नालासोपारा पेल्हार परिसरात मुंबई पोलिसांनी छापा टाकून एका रासायनिक कारखान्याच्या नावाखाली चालणाऱ्या एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या युनिटचा पर्दाफाश करत १४ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते.

तर यापूर्वी मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी कामण येथील एका सिमेंट ब्लॉक बनवणाऱ्या कंपनीत छापा टाकून एमडी ड्रग्जचा कारखाना उध्वस्त करून ८ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाई वरूनच वसई विरार भागातील अमली पदार्थांची पाळेमुळे अगदी खोलवर रुजत असल्याचे समोर येत आहे.

स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह ?

वसई-विरारमध्ये सातत्याने होणाऱ्या या कारवायांमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण बहुतांश मोठ्या कारवाया मुंबई पोलिसांच्या पथकाने केल्या आहेत. पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून काही मीटर अंतरावर अमली पदार्थ कारखाना होता. तर कामण परिसर हा नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. मात्र आपल्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची पोलिसांनाच कल्पना नाही. त्यामुळे येथील स्थानिक पोलीस नेमके करतात काय ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

कारखाने कुठे आणि कसे ?

वसई विरार भागातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. विशेषतः औद्योगिक कारखाने त्यात बसविण्याच्या दृष्टीने ही बांधकामे केली जात आहेत. मात्र काही ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या गाळ्यात व शेड मध्ये रासायनिक कारखाने व अन्य कारखान्यांच्या नावाखाली अमली पदार्थांची निर्मिती करणारे कारखाने चालविले जात असल्याचे नुकताच केलेल्या कारवाईतून उघड झाले आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणच्या भागात उभी राहत असलेली अनधिकृत बांधकामेच आता अमली पदार्थांच्या निर्मितीसाठीची केंद्र बनू लागली आहेत.