Vasai Virar Drug Smuggling : मीरा भाईंदर वसई विरार शहरात अमली पदार्थाचा मोठा सुळसुळाट निर्माण झाला आहे. या अमली पदार्थांच्या तस्करीला रोख लावण्यासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. नुकताच पोलीस आयुक्तालयाने तेलंगणातून वसई व मीरा भाईंदर शहरात अमली पदार्थाची तस्करी होत असल्याचे उघड केले होते. मागील आठ महिन्यात मीरा भाईंदर आणि वसई विरार शहरातील विविध ठिकाणी छापेमारी करत ५६ कोटी ६८ लाख किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. यात ९३५ गुन्हे दाखल असून २८७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शहरातील काही भाग आता अमली पदार्थांची केंद्र बनू लागली आहेत. यात तुळींज, संतोष भुवन, प्रगतीनगर अलकापुरी, आचोळे, डोंगरी, भीम डोंगरी,शिर्डीनगर. बिलालपाडा, मोरे गाव तलाव परिसर, अगरवाल नगर अशी प्रामुख्याने ठिकाणे आहे. मिरा भाईंदर मधील मिरारोड, हटकेश अशा ठिकाणाहून अमली पदार्थ तस्करीच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः यात नायजेरियन नागरिकांचा ही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येऊ लागले आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. यावरूनच अमली पदार्थांची पाळेमुळे अगदी खोलवर रुजत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आयुक्तलयाने विविध ठिकाणच्या भागात कारवाईची मोहीम आखली असून विविध ठिकाणी कारवाया केल्या जात आहेत.

हेरॉईन, मेफेड्रोन, गांजा अशा विविध प्रकारच्या अमली पदार्थांच्या तस्करांचा मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे. मागील जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात पोलीस आयुक्तालयाने ५६ कोटी ६८ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यात ९३५ गुन्ह्यात २८७ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तेलंगणातील सर्वात मोठी कारवाई

मीरा भाईंदर व वसई विरारमध्ये तेलंगणा राज्यातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते याच पार्श्वभूमीवर तेलंगणा राज्यात गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करून कारखाने उध्वस्त केले होते. यात सुमारे ६ हजार किलो ग्रॅम वजनाचे मॅफेड्रोन अमली पदार्थ जप्त केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर या अमली पदार्थांची किंमत १२ हजार कोटी इतकी असल्याचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी सांगितले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्वात मोठी कारवाई आहे.

नायजेरियन नागरिकांचा वाढता सहभाग…

वसई विरार व मीरारोड अशा ठिकाणच्या भागात मोठ्या संख्येने नायजेरियन नागरिक वास्तव्यास आले आहेत. वसई, विरारमधील विशेषतः नालासोपारा भागात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांच्या कृतीने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शहरात घडणाऱ्या अमली पदार्थ विरोधी कारवायांमध्ये नायजेरियन आणि परदेशी नागरिकांचा सहभाग असल्याचे गुन्ह्यातील तपासादरम्यान पोलिसांना दिसून आले आहे.

अमली पर्दाथ ही सध्याच्या घडीला मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे या विरोधात विशेष मोहीम सुरु केली आहे. अमली पर्दाथ फक्त माणसांचेच नुकसान करत नाहीत तर यामुळे संपूर्ण समाजाला याचा धोका आहे. यासाठी भविष्यात देखील ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल. – निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, वसई विरार मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय