वसई: विरारमधील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली. आगीमुळे घरातील साहित्य जळून खाक झाले असून अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली आहे.

विरार पूर्वेला नारंगी परिसर आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास अचानक या परिसरातील ध्रुवी अपार्टमेंट नावाच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेत भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीच्या तीव्रतेमुळे घरातील फ्रिज आणि एसीचा देखील स्फोट झाला आहे. ज्यामुळे आगीने अधिक उग्र रूप धारण केले. या घटनेमुळे इमारतीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगीच्या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली असून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु असून. सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. नेमकी आग कोणत्या कारणामुळे याचे कारण अजूनही समजू शकले नाही.

यापूर्वीच्या आग दुर्घटना

१ ऑक्टोबर २०२५ नालासोपारा पूर्वेतील लंबोदर अपार्टमेंट येथील ९ व्या मजल्यावरील बंद सदनिकेला आग लागल्याची घटना घडली होती. सदनिकेत लागलेल्या भीषण आगीत घरातील सामान जाळून खाक झाले होते. तर या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नव्हती.

३० सप्टेंबर २०२५ नालासोपारा पूर्वेतील एका कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत दुकानात लागलेली आगीमुळे दुकानातील सामान जळून खाक झाल्यामुळे दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.