वसई: लक्ष्मीपूजनानिमित्त वसई विरारच्या बाजारपेठा झेंडूच्या फुलांनी बहरून गेल्या आहेत. पावसामुळे जरी झेंडूच्या फुलांची आवक घटली असली तरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जुन्या आणि नव्या अशा दोन्ही प्रकारच्या झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.

मंगळवारी मोठ्या उत्साहात लक्ष्मीपूजन साजरे केले जाणार आहे. तर सोमवार सकाळपासूनच वसई विरारमधील बाजारपेठांमध्ये लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या पूजा साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. पूजेच्या इतर साहित्याच्या तुलनेने  बाजारात फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून आले. यातही प्रामुख्याने झेंडूची फुले, हार, तोरण आणि माळांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल अधिक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

वसई विरारच्या बाजारपेठांमध्ये ग्रामीण भागातील स्थानिक शेतकऱ्यांकडून तसेच पालघर, नाशिकच्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक होत असते. पण, वळीवाचा पाऊस आणि पुरामुळे झेंडूच्या फुलांचे उत्पादन घटले आहे. तर बाजारात उपलब्ध झालेली फुलेसुद्धा हलक्या आणि कमी दर्जाची आहेत.

सध्या बाजारात ताज्या झेंडूच्या फुलांची विक्री १६० रुपये प्रतिकिलो तर हलक्या दर्जाच्या आणि लहान गोंड्याच्या झेंडूच्या फुलांची विक्री ८० रुपये प्रतिकिलो रुपयांनी केली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

सजावटीसाठी हलक्या दर्जाच्या फुलांची खरेदी

दिवाळीनिमित्त फुलांच्या पाकळ्या वापरून घरातील अंगण, उंबरठे सजवले जातात. तर काही वेळा रांगोळी काढण्यासाठी देखील फुलांच्या पाकळ्यांचा वापर होतो. पण यंदा बाजारात झेंडूच्या फुलांची आवक घटल्याने आणि किंमती चढ्या असल्यामुळे खरेदीदारांकडून अर्ध्या किंमतीत उपलब्ध असणाऱ्या हलक्या दर्जाच्या फुलांची खरेदी अशा प्रकारच्या सजावटीसाठी केली जात आहे.

कमळ फुलांचे दर वाढले

लक्ष्मीच्या पूजेदरम्यान कमळाच्या फुलाचा आवर्जून वापर केला जातो, कारण कमळ हे लक्ष्मीला प्रिय आहे. या फुलाचा पूजेत वापर करण्याला विशेष महत्त्व आहे. यामुळे घरात धन आणि समृद्धी येते असे मानले जाते. देवी लक्ष्मीला कमळाचे फूल आवडते. ती कमळाच्या फुलात वास करते तसंच ते तिचे आसनदेखील आहे. त्यामुळे  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कमळाच्या फुलाला मोठी मागणी असते. त्यामुळे कमळांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. एक गुलाबी कमळ शंभर रुपयांनी तर तीस रुपये दराने पांढऱ्या कमळांची विक्री केली जात आहे.