वसई: वसई विरार शहरात गेल्या काही काळात उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे गुन्हेगारी कृत्यांचे केंद्र ठरत आहेत. त्यामुळे महापालिकेने अशा बांधकामांविरोधात कारवाई तीव्र केली असून गुरुवारी २४ हजार चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे.
वसई विरार शहरात विविध ठिकाणी तसेच मुंबई अहमदाबाद महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर दुकानांचे गाळे, पत्र्याचे मोठे शेड, इमारती, दुमजली चाळी अशा स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम करण्यात येत आहे. कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या या इमारती अमली पदार्थ निर्मिती आणि तस्करीचे केंद्र बनली असून यामुळे शहरातील गुन्हेगारी कृत्यांना चालना मिळू लागली आहे.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून अनधिकृत बांधकामविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत गुरुवारी महापालिकेकडून नेमण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे शहरात प्रभागनिहाय तोडक कारवाई करण्यात आली.
यात प्रभाग समिती (ए) मधील श्री गणेश इमारत डोंगरपाडा येथील ३०० चौरस फूट, प्रभाग समिती (बी) मधील साई पूजा, प्रगती नगर येथील ६०० चौरस फूट, प्रभाग समिती (सी) मधील विरार येथील मनोहर इंडस्ट्रीज पाचपायरी येथील ८ हजार ७०० चौरस फूट आणि प्रभाग समिती (डी) आचोळे स्मशानभूमी समोरील ६ हजार ५०० चौरस फूट अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे.
तसेच प्रभाग समिती (ई) मधील नालासोपारा येथील डाबरे अपार्टमेंट, मुर्गी बाजार व मनोज अपार्टमेंट येथील ३ हजार ९०० चौरस फूट, प्रभाग समिती (एफ) मधील धानीव येथील ९०० चौरस फूट बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.
तर प्रभाग समिती (जी) मधील ससूनवघर, वॉल्टन हॉटेल ते किनारा ढाबा येथील ३ हजार ३०० चौरस फूट, प्रभाग समिती (एच) मधील माणिकपूर सर्वे क्रमांक ९० येथील २४० चौरस फूट असे एकूण २४ हजार ४४० चौरस फूट बांधकाम एका दिवसाच्या कालावधीत अतिक्रमणविरोधी पथकाकडून जमीनदोस्त करण्यात आले आहे.
