वसई : निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना निश्चित करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर वसई विरार महापालिकेने तयारी सुरू केली आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ४ सदस्यांची प्रभाग रचना होणार आहे. त्यामुळे वसई विरार महापालिकेत ११५ सदस्यांसाठी एकूण २९ प्रभाग तयार केले जाणार आहेत. त्यातील एक प्रभाग हा ४ सदस्यांचा तर १ प्रभाग हा ३ सदस्यांचा असणार आहे.
वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २०२० च्या जुलै महिन्यात संपुष्टात आली होती. मात्र त्यानंतर करोनामुळे निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. तब्बल ५ वर्षानंतर निवडणुका होणार असल्याने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मंगळवारी राज्य शासनाने प्रभाग रचना निश्चित करून लोकसंख्येचे निकष ठरविण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर वसई विरार महापालिकाही सज्ज झाली आहे. पालिकेत निवडणुक प्रभागरचनेबाबत बैठका सुरू झाल्या असून त्यानुसार निवडणूक प्रक्रियेचे कामकाज सुरू करण्यात आली आहे. शासनाने प्रभाग रचनेबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रभाग रचनेची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली.
चार सदस्यीय प्रभाग रचना होणार
वसई विरार महापालिकेची स्थापना २००९ साली झाली. तेव्हापासून एक सदस्यीय प्रभाग रचना होती आणि ११५ नगरसेवक होते. २०२१ मध्ये त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती. मात्र निवडणूका झाल्याच नव्हत्या. आता नव्या निर्देशानुसार ४ सदस्यांची प्रभाग रचना केली जाणार आहे. यासाठी २०११ च्या लोकसंख्येचे निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार एका प्रभागात ३५ हजार ते ४० हजार लोकसंख्या असेल. २८ प्रभाग हे ४ सदस्यांचे तर एक प्रभाग हा तीन सदस्यांचा असणार आहे.