वसई:- मागील पाच वर्षांपासून रखडलेली वसई विरार महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणूकीसाठी पालिका प्रशासन ही कामाला लागले असून पालिकेच्या कार्यक्षेत्रात ११ लाखाहून अधिक मतदार आहेत. आता प्रभाग निहाय मतदार याद्या तयार केल्या जात असून लवकरच या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे या ११ लाख मतदारांच्या हाती ११५ नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २०२० च्या जुलै महिन्यात संपुष्टात आली होती. मात्र करोनाच्या संकट व विविध प्रकारच्या अडचणीमुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. आता पाच वर्षांनंतर पालिकेची निवडणूक पार पडणार आहे. महापालिका क्षेत्रात २९ प्रभाग येतात. २८ प्रभागांमध्ये प्रत्येकी ४ नगरसेवक यावेळी निवडून द्यावयाचे आहेत. तर २९ व्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत.
या सर्व प्रभागांसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची विधानसभा मतदार यादी गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार ११ लाख ४ हजार १३५ मतदारांचा यात समावेश आहे. यात ५ लाख १६ हजार १२ महिला तर ५ लाख ८७ हजार ९९९ व इतर १२४ अशा मतदारांचा समावेश आहे. याच मतदारांच्या प्रभाग निहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुरवातीला प्रारूप मतदार याद्या तयार करून त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर नागरिकांच्या हरकती व सूचना घेऊन त्यात आवश्यक फेरबदल करून याद्या अंतिम केल्या जातील असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
तिन्ही मतदार संघातील मतदार
वसई विरारच्या कार्यक्षेत्रात बोईसर , नालासोपारा आणि वसई असे तीन मतदार संघ येत आहेत. नालासोपारा हा सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ आहे. या निवडणुकीत नालासोपारा मतदारसंघातील ६ लाख ५६ हजार १९८, वसई मधील ३ लाख १२ हजार २६६ आणि १ लाख ३७ हजार ६७१ इतके मतदार आहेत. या सर्व मतदारांवरच ११५ नगरसेवकांचे भवितव्य ठरणार आहे.
राजकीय उलथापालथ
आगामी महापालिका निवडणुकीसाठी वसई विरार शहरातील सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून त्यांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. २०१५ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत तर ११५ पैकी १०७ नगरसेवक बहुजन विकास आघाडीने निवडून आणत एका हाती सत्ता स्थापन केली होती.
मात्र मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप – सेनेच्या महायुतीने बाजी मारल्याने बविआला तिन्ही मतदार संघात पराभव स्वीकारावा लागला होता.
गेल्या ३० वर्षांनंतरच्या बदललेल्या राजकीय समीकरणानंतर ही निवडणूक होणार असल्याने मोठी राजकीय उलथापालथ या निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर पहावयास मिळणार आहे.
११ नोव्हेंबरला होणार आरक्षण सोडत
पालिकेच्या निवडणुकीसाठी विविध प्रभागासाठी आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. या आरक्षण सोडतीकडे सर्वच राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. आरक्षण सोडतीनंतर कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडेल यावर ही निवडणूकीसाठीची रणनीती ठरविली जाणार आहे.
