वसई: मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ कार्यालयाच्या पथकाने मिरारोडमध्ये छापा टाकून अवैध ऑनलाईन क्रिकेट बेटिंग चालवणाऱ्या दोन इसमांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून १ लाख ६७ हजार २८० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिरारोड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात एका बंद घरात अवैध ऑनलाईन क्रिकेट बेटींग चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी परिमंडळ-१ चे पोलीस उप आयुक्त राहुल चव्हाण यांच्या पोलीस पथकाने मिरारोडमधील एका इमारतीतील बंद घरात छापा टाकला. यावेळी दोन इसम मोबाईलवरुन क्रिकेटसह इतर वेगवेगळ्या खेळांवर बेकायदेशीर बेटिंग खेळत असल्याचे, तसेच इतरांनाही बेटिंग करण्यासाठी भाग पाडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
अवैध बेटिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, विदेशी चलन असा १ लाख ६७ हजार २८० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात शुक्रवारी मिरारोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम-१८८७ चे कलम ४, ५ सह कलम २५ (सी) भारतीय तार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, परिमंडळ-१ पोलीस उप आयुक्त राहुल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक उज्वल आरके, पोलीस उपनिरीक्षक अजय मांडोळे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष सांगवीकर, अमोल बामणे, कल्याणी पवार यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
