विरार : शनिवारी वसई विरार शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील काही सखल भाग पाण्याखाली जाऊन वाहतूक आणि जनजीवन काही काळ विस्कळीत झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी झाड कोसळल्याने रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता तर साचलेल्या पाण्यात दुचाकी वाहने बंद पडत असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. दिवसभर शहरात सरासरी ८३ मी. मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मागील दोन दिवसांपासून वसई विरार शहरात पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या पावसाचा जोर शनिवारी मध्यरात्रीनंतर वाढला. त्यामुळे शनिवारी पहाटेपासूनच शहारातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे शहरात गोपाळकाला सणाचा उत्साह असतानाच काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यावेळी विरार येथील विवा महाविद्यालय परिसर, साईनाथ नगर, बोळींज, ग्लोबल सिटी,नंदाखाल, दोन तलाव -वटार रस्ता यासह नालासोपारा येथील अलकापुरी, गाला नगर, गास रस्ता, संकेश्वर नगर आणि रेल्वे स्थानक परिसरांत पाणी साचले.
तसेच, वसईतील सागर शेत, गिरीज रस्ता माणिकपूर, वसई गाव, बंगली नाका, देवतलाव आणि नायगाव पूर्वेकडील स्टार सिटी, रिलायबल, सनटेक यांसारख्या विविध ठिकाणीही पाणी भरले होते. यावेळी अनेक गृहसंकुलांमध्ये पाणी जमल्याने नागरिकांना तरस सहन करावा लागला. पालिकेकडून ठिकठिकाणी सक्शन पंपाची व्यवस्था करण्यात आली होती. सागरशेत परिसरात पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी गटाराचे झाकण उघडण्यात आले होते. यावेळी कुणाचा अपघात होऊ नये म्हणून पालिकेच्या तीन महिला सफाई कर्मचारी सात तासांपासून एका जागी उभ्या राहून नागरिकांना सूचना देत होत्या.
साचलेल्या पाण्यामुळे गोविंदांची गैरसोय
सकाळपासूनच शहरात पाऊस असून देखील गोविंदापथकांचा उत्साह पाहायला मिळत होता. पावसाची पर्वा न करता गोविंदा आनंदाने घराबाहेर पडले होते. मात्र, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने गोविंदांना पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. तर दुसरीकडे गावांमध्ये सकाळी दहीहंडीसाठी लागणारे सामान घेण्यासाठी बाहेर पडलेल्या गोविंदांना साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचले असल्याने दुचाकी चालवणेही अवघड असल्याचे दिसून आले.
नानभाट येथे चिंचेचे झाड कोसळले
वसई-विरार शहरात पावसाचा जोर कायम असतानाच नालासोपारा पश्चिमेच्या नानभाट-नाळा रोडवर एक भलेमोठे चिंचेचे झाड उन्मळून पडले. झाड रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल ४ ते ५ तास ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मॅकलिफ्टन वाहन, कटर मशीन आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने जवानांनी झाड कापून बाजूला केले आणि रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला.
पालघर जिल्ह्याला तीन दिवस ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने पालघर जिल्याला पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट दिला असून यावेळी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दुपारी तासाभराची विश्रांती घेतल्यांनंतर संध्याकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. शहरात पावसाचा जोर कायम राहणार आहे त्यामुळे शहरातील अनेक सखल भाग आणि मुख्य रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
वसईतील दिवसभरातील पाऊस
- आगाशी मंडळ – १०९ मिमी
- निर्मळ मंडळ – ८७ मिमी
- माणिकपूर मंडळ- ९४ मिमी
- वसई मंडळ- ५१ मिमी
- विरार मंडळ- ७९ ,मिमी
- कामन मंडळ- ८० मिमी
- बोळींज मंडळ- १०३ मिमी
- मांडवी मंडळ- ७२ मिमी
- पेल्हार मंडळ- ७२ मिमी
- एकूण – ७४७ मिमी
शहरातील एकूण सरासरी- ८३ मिमी