वसई : वसई विरार शहराला मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसू लागला आहे. शनिवारी दुपारी सुद्धा शहरात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. अवघ्या काही मिनिटे कोसळल्या पावसात नालासोपारा परिसरातील रस्ते जलमय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांची ही चांगलीच तारांबळ उडाली .
ऑक्टोबर महिना सरत आला तरी वसई विरार शहरात अधूनमधून पावसाची हजेरी सुरूच आहे. दिवाळी संपल्यानंतरही शहरात पावसाचा जोर कायम आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने रविवार पर्यँत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
शनिवारी दुपारी वसई विरारच्या विविध ठिकाणच्या भागात पावसाचे हजेरी लावली आहे. काही भागात पावसाची रिमझिम सुरू आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
या अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होऊ लागली आहे. विशेषतः नालासोपारा परिसरात अवघ्या काही मिनिटे पाऊस कोसळला मात्र या परिसरातील गालानगर यासह विविध ठिकाणी पाणी साचून रस्ते जलमय झाले आहे.
पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे धुळीने भरलेले रस्ते आता चिखलमय झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
अवकाळीमुळे बळी राजा संकटात
वसई विरार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भात पिके कापणीसाठी तयार झाली आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी भात कापणी सुरू केली आहे. या अवकाळी पावसात कापणी केलेले भात भिजून गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पावसाचे सत्र असेच सुरू राहिले तर हातातोंडाशी आलेला घास निसटून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
